आकडा सांगण्यापेक्षा कृतीला महत्व देणारे आपले सरकार आहे. त्यामुळे आपणास जी कामे करायची त्याचे आराखडे सादर करा. निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. गणपतीपुळेच नव्हे तर कोकणासह नवा महाराष्ट्र घडवायचं काम आपण सर्व जण मिळून करू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. गणपतीपुळे येथील 102 कोटींच्या विकास आराखड्याचे भूमिपूजन सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘आजचा दिवस माझ्यासाठी तीर्थयात्रेचा दिवस आहे. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी वास्तूचा लोकार्पण सोहळा अर्थात शौर्यदिन साजरा करून मी इथे आलोय आणि येथून आंगणेवाडीला जाणार आहे.’ त्यामुळे आज एक पवित्र दिवस असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोणत्याही ठिकाणचा विकास करताना तेथे स्वच्छता, उद्याने ही असायलाच हवीत. आपण आपल्या देवस्थांनाना देखील तितकं मंगलमय ठेवलं पाहिजे. म्हणजे भाविकांना मंगलमूर्तीचं दर्शन झाल्याचं समाधान खर्या अर्थाने प्राप्त होईल, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी अंबरनाथ येथील मंदिराचा दाखला आपल्या भाषणात दिला.
