स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन गरजेचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

0

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भारतातील जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी केलेले कार्य अत्यंत उल्लेखनीय असून त्यांच्या विचारांनुसार जातिव्यवस्थेचे उच्चाटन होणे, ही राष्ट्रनिर्माणासाठी अत्यंत गरजेची बाब आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. येथील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात नवी दिल्लीच्या भारतीय इतिहास संशोधन परिषदेतर्फे (आयसीएचआर) आयोजित स्वा. सावरकरांवरील करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या विशेष राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त देशभरात विविध राष्ट्रीय परिषदा, कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्यआंदोलनात अनेक राष्ट्रीय नेते, पुढारी यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता सहभाग घेतला. रत्नागिरी जिल्हाही यात मागे नव्हता. रत्नागिरीचे सुपुत्र लोकमान्य टिळक यांचे स्वातंत्र्य आंदोलनातील योगदान सर्वपरिचित आहे. स्वा. सावरकर यांनीही रत्नागिरीसारख्या गावात जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी केलेले विचारमंथन आणि कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचावे, या हेतूने भारतीय इतिहास अनुसंधान परिषदेने डिस्मेंटलिंग कास्टिझम – लेसन्स फ्रॉम सावरकर्स एसेन्शियल्स ऑफ हिंदुत्व या विषयावरील ही राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे. परिषदेचे उद्घाटन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीत, सरस्वती वंदना, स्वा. सावरकरांच्या पुतळ्याचे पूजन आणि दीपप्रज्वलनाने झाली. राज्यपाल म्हणाले, ‘भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली असली, तरी आजही भारतात काही गावांमध्ये अस्पृश्यता पाळली जाते. भारतातून ही जातीयता नष्ट होईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाज, राष्ट्र सुस्थिर होईल. भारतीय जातिव्यवस्था आणि अस्पृश्यता निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी रत्नागिरीत केलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आणि गौरवपूर्ण आहे. सावरकरांची कर्मभूमी असलेल्या रत्नागिरीत ही राष्ट्रीय परिषद होत आहे, ही एक उल्लेखनीय गोष्ट आहे. सावरकर हे सामाजिक समतेचे मोठे पुरस्कर्ते होते. आज देशाला सावरकरांच्या विचारांची आवश्यकता असून, नव्या पिढीने त्यांचे विचार आत्मसात करण्याची गरज आहे. परिषदेत भारतभरातील वक्ते, विचारवंत स्वा. सावरकर यांचे विचार आणि कार्यावर प्रकाश टाकणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन ‘आयसीएचआर’च्या सहायक संचालिका डॉ. नुपूर सिंग यांनी केले.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
6:07 PM 25-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here