मुंबई : परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी एसटी महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाला दिवाळीची गोड भेट दिली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची भेट म्हणून अधिकाऱ्यांना ५ हजार रूपये तर कर्मचाऱ्यांना २५०० रूपये देण्यात येणार असल्याची घोषणा मंत्री ॲड. परब यांनी सोमवारी केली. या निर्णयाचा लाभ महामंडळाच्या सुमारे ९३ हजारांहून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना होणार आहे. विशेष म्हणजे प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेला होणारा पगार यंदा मात्र नोव्हेंबरच्या १ तारखेला म्हणजे दिवाळीपूर्वी होणार आहे. महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी कर्मचाऱ्यांची मागणी होती. या मागणीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी सकारात्मक प्रतिसाद देत महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला. सध्या कर्मचाऱ्यांना १२ टक्के महागाई भत्ता मिळत आहे, त्यात आणखी ५ टक्के वाढ करण्याचा निर्णय मंत्री, ॲड. परब यांनी घेतला. त्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता १७ टक्के होणार आहे. एसटीच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होण्यासाठी मुख्यमंत्री श्री. उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री श्री. अजित पवार यांनी केलेल्या मदतीबद्दल ॲड. परब यांनी त्यांची आभार मानले आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:43 AM 26-Oct-21
