‘माहेर’ संस्थेने घडवली आई आणि मुलाची भेट

0

रत्नागिरी : ताटातूट झालेल्या आई आणि मुलाची भेट हातखंबा येथील माहेर संस्थेने घडवून आणली. संस्थेत अनाथ, निराधार, रस्त्यावर फिरणारे, भरकटलेले मनोरुग्ण, नातेवाईक नसणारे, जिल्हा रुग्णालय, पोलीस ठाणे येथून पाठविलेले महिला-पुरुष दाखल होत असतात. गेल्या जानेवारी महिन्यात रेल्वे पोलिसांना रत्नागिरीच्या रेल्वे स्थानकावर सुमारे पन्नास वर्षे वय असलेली एक निराधार आणि मानसिक रुग्ण महिला आढळली होती. ती आपले नाव बिजराणी पासी (उत्तर प्रदेश) असे सांगत होती. रेल्वे पोलिसांनी तिच्या नातेवाईकांचा मोबाइल नंबर मिळवून त्यावर संपर्क साधला. परंतु त्यावर प्रतिसाद येत नव्हता. त्यामुळे तिला नातेवाईक येईपर्यंत माहेर संस्थेत दाखल करण्यात आले. संस्थेत तिच्यावर योग्य ते औषधोपचार झाले. घरच्यासारखे वातावरण लाभल्याने बिजरानी पासीच्या मानसिक स्थितीत सुधारणा झाली. तिने आपले पूर्ण नाव, गाव आणि कुटुंबाची माहिती माहेर संस्थेचे अधीक्षक, सामाजिक कार्यकर्ते सुनील कांबळे यांना दिली. बिजराणी पासी इंटरनेटचा वापर करीत उत्तर प्रदेशातील कानपूरजवळील उदतपूर या गावातील रहिवासी असल्याचे लक्षात आले. तिचे पती आणि मुलाचा मोबाइल नंबर मिळवला. त्यांच्याशी संपर्क साधून बिजराणी रोजद पासी रत्नागिरीत असल्याचे त्यांना कळविले. मात्र, लॉकडाउन आणि खूप पाऊस असल्याने उत्तर प्रदेशातून नातेवाईकांना रत्नागिरीत येणे लवकर शक्य झाले नाही. दरम्यान, बिजराणी आपल्या कुटुंबाशी फोनवर संपर्क ठेवून होती. नातेवाईकाशी बोलणे होत असल्याने आनंदी होती. शेवटी तिचा दुसरा मुलगा दीपक वर्मा पासी माहेर संस्थेत दाखल झाला. आईला घरी घेऊन जाण्यासाठी आपण आल्याचे त्याने सांगितले. एका वर्षाने आईला पाहून तो गहिवरला. बिजराणीला पती आणि सहा मुले आहेत. तिची मानसिक स्थिती थोडी बिघडली असल्याने ती भावाकडे जाते, म्हणून घरातून बाहेर पडली ते परत आलीच नाही. नातेवाईकांनी खूप शोधले परंतु ती सापडली नव्हती. अशीच भरकटत ती रत्नागिरीत आली होती. मुलाला पाहून बिजरानी आनंदून गेली. कागदपत्रांची शहानिशा करून तिला तिचा मुलगा दीपक वर्मा पासी याच्या ताब्यात देण्यात आले. एका वर्षाने आई आणि मुलाची भेट माहेर संस्थेने घडवून आणल्याने संस्थेतील सर्वांच्या चेह-यावर समाधान उमटले.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:08 PM 26-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here