कर्जत येथील उपकारागृहातून एकाच वेळी पाच कुख्यात आरोपींनी पलायन केल्याची घटना 9 फेब्रुवारी रोजी घडली होती. यावेळी कारागृहात रक्षणासाठी असलेल्या पोलीस कर्मचार्यांनी कर्तव्यात कसुर केला म्हणून प्रभारी पोलीस अधीक्षक डॉ. सागर पाटील यांनी चौघा पोलीस कर्मचार्यांना निलंबित केले आहे. यामध्ये पोलीस नाईक रावसाहेब, दशरथ नागरगोजे, जालिंदर काशिनाथ माळशिकारे, दीपक शिवमूर्ती कोल्हे, देविदास सोपान पळसे यांचा समावेश आहे. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने सायंकाळी सातनंतर पाच आरोपींनी छताचे गज कापून पलायन केले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती. घटनास्थळी नाशिक परीक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक छेरींग दोर्जे यांनी भेट देऊन पाहणी केली होती. यानंतर तपासाची चक्रे फिरवत तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर अद्याप दोघे पसार आहेत. आरोपी पलायन झाल्याने यावेळी सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचार्यांची चौकशी करून चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जे आरोपी पळून गेले होते त्यातील तीन आरोपींचा अद्यापपर्यंत तपास लागलेला आहे. दोन आरोपींचा तपास लागलेला नाही, जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून अहवाल येथील जिल्हा पोलीस प्रशासनाला दिला होता. त्यानंतर प्रभारी पोलीस अधीक्षक सागर पाटील यांनी सोमवारी चार पोलिसांना निलंबित केले आहे.
