नवी दिल्ली : दुचाकीवर चार वर्षांपर्यंतच्या बालकांना सुरक्षा कवच देणे सक्तीचे असून, गाडीवरून बालकाला नेत असताना त्याला क्रैश हेल्मेट (लाईट वेट) घालावेच लागणार आहे. तसेच मुलाला घेऊन ताशी ४० किलोमीटर या कमाल वेगमर्यादेपेक्षा अधिक वेगाने दुचाकी चालविल्यास आता महागात पडू शकते. अशा प्रकारे दुचाकी चालवणे हे वाहतूक नियंत्रण कायद्याचे उल्लंघन ठरणार असून त्यासाठी दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. बालकांच्या सुरक्षेचा विचार करून रस्ते परिवहन मंत्रालयाने याबाबतचा नवीन प्रस्तावित कायदा तयार केला असून बालकांच्या सुरक्षेसाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. याबाबतचे नियम सरकारने २१ ऑक्टोबरच्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध केले आहेत. यासाठी नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्या ३० दिवसांच्या आत पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या नवीन प्रस्तावित कायद्यानुसार जर चार वर्षापेक्षा अधिक वयोगटातील मुलगा दुचाकीवर बसवल्यास त्याला स्वार मानले जाईल. तसेच दोन माणसांबरोबर चार वर्षांवरील मुलगा बसल्यास त्याला ट्रिपल सीट मानले जाईल आणि दंडात्मक कारवाई केली जाईल. त्यासाठी १ हजार रुपयापर्यंतचा दंड ठोठावला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे एक व्यक्ती आणि एक मुलगा दुचाकीवर बसल्यास सुरक्षेचा नियम पाळणे सक्तीचे असून त्याचे उल्लंघन केल्यासही दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. दुचाकी अपघातामध्ये मुलांच्या वाढत्या मृत्यूंचा विचार करून रस्ते मंत्रालयाने हा नवीन कायदा तयार केला असून नवीन नियमांचे पालन केल्यास अशा दुर्घटना टाळण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात आले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:09 PM 27-Oct-21
