चिपळूण : गेल्या तीन महिन्यांपूर्वी अतिवृष्टी व महापुराने चिपळूणवासीयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. भविष्यात पुरावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने उपाययोजना आखण्याची गरज आहे, अशी मागणी चिपळूणवासीयांमधून जोर धरू लागल्यानंतर सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्चच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच चिपळुणातील शीवनदीसह वाशिष्ठी नदीपात्राची पाहणी केली. पुरावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने अहवाल जलसंपदा विभागाला सादर केला जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. अतिवृष्टी व महापुरानंतर जलसंपदा विभागाकडून चिपळूण शहरात निळी व लाल रेषा आखण्यात आली. चिपळूणवासियांना याबाबत विश्वासात घेतले नसल्याने शहरवासियांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तर पुरावर नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना आखल्या जात नाहीत, तोपर्यंत तसेच लाल व निळी रेषा रद्द होईपर्यंत चिपळूण बचाव समितीने आमचा लढा सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे. तर दुसरीकडे आ. शेखर निकम यांनी देखील हा विषय जलसंपदा मंत्री जयंतपाटील यांच्यापर्यंत पोहोचवला आहे. चिपळूणवासीयांची मागणी लक्षात घेता जलसंपदा मंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती दिली आहे. दरम्यान, गुरुवारी सेंट्रल वॉटर अॅण्ड पॉवर रिसर्च कमिटीचे अधिकारी चिपळुणात आले होते. यावेळी या अधिकाऱ्यांनी जगबुडी नदीचे मुख, गोवळकोट, ऐन्रॉन ब्रीज, नाईक कंपनी, पेठमाप, नलावडा बंधारा, बहादूरशेख नदीपात्राची पाहणी केली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते शाहनवाज शाह व प्रकाश पवार यांनी चिपळूणात पाणी कसे शिरले याची माहिती दिली. या पाहणी कमिटीत सेंट्रल वॉटर कमिटीच्या शास्त्रज्ञ डॉ. निना इसाक, शास्त्रज्ञ पी.एस. कंजीर, शास्त्रज्ञ पी.डी. पाटील, शास्त्रज्ञ व्ही.आर.मेदे, तर रत्नागिरी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील, चिपळूण उपविभागीय अधिकारी संजय नलावडे, स्थापत्य अभियंता विष्णू टोपरे यांचा समावेश होता. यावेळी मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे हे देखील उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:35 PM 27-Oct-21
