मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला 1 ऑगस्टपासून मोझरीतून सुरुवात होत असून या यात्रेतून भाजपा विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. या यात्रेचा पहिला टप्पा – मोझरी ते नंदुरबार, तर दुसरा टप्पा – अकोले, अहमदनगर, नाशिक असा आहे. 25 दिवस चालणारी ही यात्रा मुंबई वगळता 32 जिल्ह्यांतून जाणार आहे. 152 विधानसभा क्षेत्रांत ही यात्रा निघणार आहे. साडेचार हजार किलोमीटरहून अधिक चालणार्या या यात्रेचा समारोप नाशिक तीर्थक्षेत्री या होणार आहे. या यात्रेदरम्यान 300 पैकी 104 जाहीर सभा तर 228 स्वागत सभा होणार असून या यात्रेच्या रथामध्ये मुख्यमंत्र्यांसाठी सभेचे व्यासपीठ तयार करण्यात आले आहे. सभेच्या ठिकाणी या व्यासपीठाचा उपयोग करण्यात येईल. माईक आणि एलईडीचीही रथात व्यवस्था आहे. यामध्ये भाजपा सरकारने केलेल्या विकासकामांची चित्रफीत दाखवली जाईल.
