जिल्हा बँक निवडणुक: पहिल्याच दिवशी एका उमेदवाराचा अर्ज मागे

0

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याची मुदत १० नोव्हेंबरपर्यंत असून, अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी हरेश्वर हरिश्चंद्र कालेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे औद्योगिक मतदार संघात थेट लढत होणार की याठिकाणीही बिनविरोध होणार याकडे बँकेच्या सभासदांचे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हास्तरीय औद्योगिक मतदारसंघातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज हरेश्वर कालेकर यांनी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या पहिल्याच दिवशी मागे घेतला. त्यामुळे या मतदारसंघात आता सहकार पॅनेलचे उमेदवार तथा बँकेचे विद्यमान संचालक मधुकर शंकर टिळेकर यांच्या विरूद्ध इब्राहीम अहमद दलवाई यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. चिपळुणातील उद्योजक असलेले इब्राहीम दलवाई हे काँग्रेसचे जिल्हयातील ज्येष्ठ पदाधिकारी असून माजी खासदार व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसेन दलवाई यांचे निकटवर्तीय मानले जातात. सहकार पॅनल बनवताना बँकेत राजकारण नको म्हणून राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस व भाजपने एकत्र येत सर्व पक्षिय सहकार पॅनल तयार केले होते. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्याकडे वाटचाल सुरु होती. परंतु विविध पक्षातील काही नाराज सभासदांनी निवडणुकीत अर्ज दाखल करीत रंगत आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अर्ज छाननीमध्ये सात अर्ज बाद झाल्याने सहकार पॅनलचे तीन उमेदवार बिनविरोध झाले आहेत. २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध होणार असल्याने १२ जागांसाठी मतदान होण्याची शक्यता आहे. १० नोव्हेंबर दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने पुढील चौदा दिवसात कितीजण अर्ज मागे घेतात याकडे बँकेच्या सभासदांचे लक्ष लागले आहे

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:57 AM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here