लांजात सशस्त्र चोरट्यांनी फोडला बंगला

0

लांजा : सशस्त्र चोरट्यांकडून लांजा माऊली नगर येथील भर वस्तीतील बंगला फोडून चोरीचा अयशस्वी प्रयत्न केल्याची घटना बुधवारी २७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चोरट्यांना पाहिल्यानंतर स्थानिक तरुणांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातील एका चोरट्याने रिव्हॉल्वर दाखवून पळ काढला. या घटनेने लांजा शहरात खळबळ उडाली आहे. या घरफोडीत चोरट्यांच्या हातात काहीही लागले नाही. कपाटात असलेल्या खोट्या दागिन्यांचे बॉक्स आणि डब्या खरे सोने समजून चोरट्यांनी हडप केले. लांजा रेस्टहाऊस माऊली नगर येथे मंगेश शांताराम देसाई यांचा योगिराज नावाचा बंगला आहे. देसाई यांच्या आजुबाजूला श्री. पुरंदरे आणि संजय विश्वासराव यांचे बंगले आहेत. पैकी पुरंदरे कुटुंब मुंबईला वास्तव्याला असल्याने त्यांचा बंगला बंद असतो तर देसाई यांच्या बाजूला असलेल्या संजय विश्वासराव हे शिक्षक असल्याने ते शाळेत गेले होते. मंगेश देसाई आणि त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक असल्याने ते दोघेही बुधवारी शाळेत गेले होते तर त्यांचा मुलगा हा दुपारी १ वाजेपर्यंत घरी होता. त्या नंतर तो घराबाहेर पडला होता हिच संधी साधत दुचाकीने आलेल्या दोघा चोरट्यांनी देसाईंच्या बंगल्यात मागून प्रवेश केला. बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेला दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर बंगल्यातील दोन्ही बेडरूममधील कपाट फोडून चोरीचा प्रयत्न केला. दोन्ही कपाटातील कपडे अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले होते. मात्र, चोरट्यांच्या हाताला काही लागले नाही. हे चोरटे बंगल्यातून बाहेर पडत असताना शेजारील तरुण साई जुवेकर, सोहम सरदेसाई, रोहित धोंडये यांनी त्यांना पाहिले. त्यांनी हटकले असता चोरट्यांनी बंगल्याच्या मागून संरक्षक भिंत करून पळण्याचा प्रयत्न केला. स्थानिक तरुणांपैकी एका तरुणाने या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याच वेळी त्या चोरट्यांपैकी एकाने आपल्या बॅगेतून रिव्हॉल्वर बाहेर काढले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणांनी चोरट्याला सोडून दिले. त्या नंतर चोरट्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. दरम्यान, भर वस्तीत आणि दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेने लांजा शहर परिसरातील नागरिकांमध्ये घबराहट पसरली आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:53 PM 28-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here