मुंबई : आरोग्य सेवकांची भरती सुरू असली तरी कोरोना काळामध्ये काम करत असलेल्या आरोग्य सेवकांची सेवा पुढील सुनावणी पर्यंत समाप्त करू नये अशी विनंती वजा निर्देश सरकार पक्षाला मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने आरोग्य सेवक यांनी दाखल केलेल्या याचिकेवरती दिले. आरोग्य सेवक यांच्या वतीने ॲड राकेश भाटकर यांनी काम पाहिले. कोरोना काळामध्ये आरोग्य सेवकांची कमतरता असल्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात नर्सेस तसेच वॉर्डबॉय यांच्या भरती ची आवश्यकता होती परंतु गेले अनेक वर्षे शासनातर्फे भरती न केल्या गेल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरती मोठ्या प्रमाणात ताण वाढला होता. मार्च 2020 मध्ये साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आणि त्यानंतर केंद्र शासनाकडून आवश्यक असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्या निर्देशाप्रमाणे जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष या नात्याने रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी तात्पुरत्या स्वरूपाच्या भरतीची अनेक वेळा जाहिरात दिली परंतु त्यालाही अल्प प्रतिसाद मिळत होता. याच काळात ज्या आरोग्य सेवकांनी कोरोना काळातील सेवा स्वीकारली त्यांचा सन्मान करण्यासाठी केंद्र शासनाने दिनांक 3 मे 2021 रोजी मार्गदर्शक तत्त्वे लागू केली असून त्यामध्ये 100 दिवसापेक्षा जास्त कोरोना रुग्णालयात काम केलेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरीत प्राधान्य देण्यास सांगितले होते. महाराष्ट्र शासनाने आरोग्य विभागातील 3500 लोकांची भरती प्रक्रिया सुरू केली असून जाहिरातही प्रसिद्ध केली आहे. परंतु केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा त्यामध्ये उल्लेख केलेला नाही तसेच कोरोना काळामध्ये काम केलेल्या आरोग्य सेवकांना प्राधान्य दिले नाही यास्तव जून 2020 पासून आजतागायत कोरोना रुग्णालयांमध्ये काम करत असलेले वार्ड बॉय तसेच नर्सेस अशा एकूण 72 जणांनी झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणीसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठाने सकाळी दहा वाजता सुनावणीस सुरुवात केली. सुनावणीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने दिवाळी सुट्टी नंतर या प्रकरणावर अंतिम सुनावणी घेण्याचे स्पष्ट करत तोपर्यंत याचिकाकर्ते 72 जणांची सेवा समाप्त करू नये असे निर्देश सरकारी पक्षाला दिले. ही सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. प्रसन्न वराळे तसेच न्यायमूर्ती श्री. जामदार यांच्या खंडपीठासमोर झाली. श्री प्रदीप भबुजे व इतर 72 जणांच्या वतीने दाखल झालेले याचिकेचे काम ॲड राकेश भाटकर यांनी पाहिले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:03 AM 29-Oct-21
