रत्नागिरीतील कचऱ्यावर होणार प्रक्रिया; आरोग्य समिती सभापती निमेश नायर यांची माहिती

0

◼️ घनकचरा प्रकल्पामुळे दुर्गंधीपासून मिळणार दिलासा

रत्नागिरी : दांडेआडोम येथे होणारा रत्नागिरी शहराचा नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प तीन भागांत विभागला जाणार आहे. या प्रकल्पामुळे साळवी स्टॉप येथील डम्पिंग ग्राऊंड पूर्णपणे बंद होऊन तेथील दुर्गंधी आणि कचऱ्याला आग लागून वायू प्रदूषण होणेही थांबणार आहे. आपल्याच काळात या सुधारित आराखड्याला मान्यता मिळाल्याचा आनंद असल्याचे आरोग्य समिती सभापती निमेश नायर यांनी सांगितले. शहरात दररोज गोळा होणाऱ्या २२ टन ओल्या, सुक्या कचऱ्यावर शंभर टक्के प्रक्रिया होणार आहे. बायोगॅस, वीजनिर्मिती आणि खतनिर्मिती अशा तीन भागांत हा घनकचरा प्रकल्प होणार
आहे. भाभा ऑटोमिक सेंटरने विकसित केलेल्या तंत्रज्ञानाने बायोगॅस निर्मिती होणार आहे. ओल्या कचऱ्यातून खतनिर्मिती तर सुक्या कचऱ्यातील प्लास्टिक, धातू, पुठ्ठा, रद्दी, पुनर्प्रक्रियेसाठी कंपन्यांकडे पाठविला जाणार असल्याचे सभापती नायर यांनी सांगितले. या प्रकल्पातील एक कोटी ५५ लाख रुपयांचे काम यापूर्वीच झाले असून उर्वरित कामांची निविदा प्रक्रिया येत्या तीन ते चार दिवसांत राबविणार असल्याचे आरोग्य सभापतींनी सांगितले. रत्नागिरी नगर परिषदेच्या प्रकल्पाला स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत प्रकल्प अहवालास सुधारित प्रशासकीय मान्यता देताना नगरविकास विभागाने नवीन डीएसआर सुमारे ७ कोटी ९३ लाखांच्या निधीस मान्यता दिली आहे. रत्नागिरी न.प.च्या
४ कोटी ५१ लाख ६६,१३३ इतक्या निधीच्या नागरी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पास प्रशासकीय मंजुरी मिळाली होती. पण या प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी न.प.कडे जागा उपलब्ध नव्हती. सर्वोच्च न्यायालयाने ६ मे २०२० रोजी दिलेल्या निर्णयानुसार जागेची उपलब्धता न.प.कडे झाली आहे. त्यामुळे प्रकल्पास सुधारित डीएसआरनुसार मान्यता देण्याची विनंती मुख्याधिकारी, नगर परिषद यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार रत्नागिरी न.प.च्या नवीन डीएसआरनुसार ७ कोटी ९३ लाख १३,८७२ इतक्या निधीच्या घनकचरा व्यवस्थापन सुधारित प्रकल्पास शासन मान्यता मिळाली आहे. यासाठी अतिरिक्त खर्चन.प.ने १४ व्या वित्त आयोगाच्या शिल्लक निधीतन करावा असे म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:50 PM 29-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here