मुंबई : इंधन दरवाढीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केंद्र सरकारला चांगलेच झोडपले. ‘सार्वजनिक वाहतुकीतील प्रवाशांचा टक्का घसरत आहे, हे केंद्राच्याही लक्षात आले आहे. त्यामुळेच त्यांनी इंधनाचे दर वाढवायला सुरुवात केली आहे. मी टीकात्मक किंवा उपहासात्मक बोलतो, असे तुम्ही लोक म्हणता. पेट्रोल, डिझेलची दरवाढ झाल्यावर आपण टीका करतो. पण, हे आपल्या भल्यासाठी होत आहे. इंधन परवडेनासे झाले तर लोक सार्वजनिक वाहतुकीकडेच येतील ना? या चांगल्या हेतूनचे इंधन दरवाढ होत आहे. पण, आपण लक्षातच घेत नाही,’ अशा शब्दात मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले. एमएमआरडीएच्या सर्वंकष परिवहन अभ्यास – २ या अंतिम अहवालाचे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वाहतूक व्यवस्था ही शरीरातील रक्तवाहिन्यांसारखी असून सगळे मार्ग खड्डेमुक्त असले पाहिजे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था स्वच्छ आणि टापटीप हवी. आपली मेट्रो स्टेशन अप्रतिम आहेत. मी ही स्टेशने पाहिल्यानंतर माझाही त्यावर विश्वास बसला नाही. अशा मेट्रो आल्या तर मेट्रो, बस, लोकलमधून कुणालाही प्रवास करायला आवडेल. आपण खरोखरच किती आणि कसा नियोजनबद्ध विकास केला हे पाहायला पाहिजे. जिथे असा विकास झालेला नाही तिथेही आपल्याला कर्तव्य म्हणून पाणी, रस्ते, ड्रेनेज अशा सुविधा द्याव्यात लागतात. कुठलाही त्रास आणि अडथळ्यांशिवाय प्रवास करण्याचे स्वप्न एमएमआरडीएच्या या नव्या अभ्यासातून पूर्ण होणार आहे, अशी मला खात्री वाटते, असे मुख्यमंत्री म्हणाले. जनतेला सोयी-सुविधा देणे हे आपले कर्तव्य आहे. ते पार पाडताना त्यात राजकारण येऊ नये, येऊ देणारही नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:10 PM 29-Oct-21
