नवी दिल्ली : अत्यंत बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित मोटर वाहन दुरुस्ती विधेयक २०१९ राज्यसभेत मंजूर करण्यात आले. काल (ता. ३१) राज्यसभेत दुरुस्ती विधेयकावर झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर १३ विरूद्ध १०८ अशा मतांनी मंजूर करण्यात आले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यसभेत विधेयक मांडले. वाहतुकीचे नियम मोडल्यास आता दहापट दंड होणार आहे. या विधेयकान्वये ३० वर्षापूर्वीच्या कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. रस्ते अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी तसेच वाहतूक शिस्तीसाठी या विधेयकामध्ये प्रामुख्याने भर देण्यात आला आहे. त्यामुळे अनेक तरतूदी करण्यात आल्याचे नितीन गडकरी यांनी राज्यसभेत चर्चा करताना सांगितले. नव्या विधेयकानुसार अल्पवयीन मुलांनी वाहन चालवणे, विना परवाना वाहतूक, धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे, दारु पिऊन गाडी चालवणे, निश्चित वेगापेक्षा अधिक वेगाना गाडी चालवणे, आणि निश्चित सीमेपेक्षा अधिक लोकांची वाहतूक करणे अशा अनेक गोष्टींसाठी कायद्यात शिक्षेची/दंडाची तरतुद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या कायद्यात रुग्णवाहिकांना आपातकालीन स्थितीत पुढे जाण्यासाठी जागा न दिल्यास दंड होणार आहे. नव्या मोटर वाहन (दुरुस्ती) कायद्यातील प्रमुख तरतुदी : १. चार वर्षांपेक्षा मोठ्या मुलांना कारमध्ये सीटबेल्ट तर दुचाकीवर हेल्मेट बंधनकारक २. जर वरील नियमाचे उल्लंघन केल्यास वाहन मालकाला एक हजाराचा दंड ३. पर्यावरणाला हानीकारक असणाऱ्या गाड्या बाजारातून मागे घेता येणार ४. रस्ते निर्मिती सदोष झाल्यास थेट इंजिनिअर अथवा ठेकेदार दोषी धरणार ५. लहान मुलांच्या हातात वाहन दिल्यास २५ हजारांचा दंड होणार आहे. त्याचबरोबर तीन वर्ष तुरुंगवास होणार ६. गुन्हा करणाऱ्या अल्पवयीन मुलावरही कायदेशीर कारवाई होणार ७. धडक देऊन फरार झाल्यास व पीडितेचा मृत्यू झाल्यास अनुक्रमे ५० हजार आणि २ लाख रुपये दंड होणार ८. रेसिंग केल्यास पाच हजार दंड ९. सीट बेल्ट नसल्यास १ हजार दंड होणार १०. हेल्मेट न घातल्यास १ हजार दंड होणार ११. विमा वाहन नसल्यास २ हजार दंड १२. वाहनाची सदोष बनावटीमुळे अपघात झाल्यास डिलरला एक लाख आणि वाहन निर्माण करणाऱ्या कंपनीवर १०० कोटी रुपयांचा दंड १३. ओव्हर स्पीडने वाहन चालवल्यास दोन ते चार हजार दंड होणार १४. धोकादायक वाहतूक केल्यास ५ हजार रुपये दंड १५. दारु पिऊन वाहन चालवल्यास १० हजार दंड आणि तुरुंगवास होणार
