◼️ महत्वाच्या गाड्यांचे आरक्षण फुल्ल; सामान्य प्रवाशांचे हाल
चिपळूण : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रेल्वेगाड्यांना गर्दी वाढू लागली आहे. महत्वाच्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल झाले आहेत. फेस्टिवल म्हणून धावत असलेल्या गाड्यांचे तिकिटही मिळत नाही; मात्र सामान्यांना परवडणारी रत्नागिरी पॅसेंजर आणि दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर गाड्या सुरू होण्याची शक्यता अजूनही धूसर आहे. मुंबईतील लोकल रेल्वेसेवा सुरू झाली असली तरी कोकण रेल्वेमार्गावरील लोकल रेल्वे कधी सुरू होणार, याचीच सर्वांना प्रतीक्षा आहे.
कोरोना संसर्ग कमी झाल्यापासून सध्या चिपळूण रेल्वे स्थानकातून नियमित पंधराहून अधिक एक्सप्रेस गाड्या धावत आहेत. तब्बल २० हून अधिक मालगाड्यांची ये-जा सुरू आहे. पॅसेंजर गाड्यांच्या तुलनेत एक्सप्रेस गाड्यांचे तिकिटदर जास्त आहेत. दिवाळीनिमित्त कोकणातील चाकरमानी गावी येतात तसेच कोकणात कामानिमित्त असलेले अनेक परप्रांतीय कामगार दिवाळीसाठी गावी जातात. चिपळूण-गुहागर परिसरातील लोक रेल्वेच्या आरक्षणासाठी चिपळूण रेल्वे स्थानकावर गर्दी करताना दिसत आहेत. त्यांच्याकडून पॅसेंजर गाडी कधी सुरू होणार, अशी विचारणादेखील रेल्वेच्या तिकीट खिडकी विभागातील कर्मचाऱ्यांकडे केली जात आहे. कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यामुळे आता तरी लोकल सेवा सुरू करावी, अशी मागणी आम्ही कोकण रेल्वे महामंडळाकडे केली आहे. जेणेकरून सामान्य लोकांना कमी पैशात सुरक्षित प्रवास करत येईल तसेच प्रवाशांची नियमित तपासणी करावी, असे शौकत मुकादम, अध्यक्ष कोकण रेल्वे अन्याय निवारण समिती यांनी सांगितले.
कोकणातील प्रवासी शंभर ते दीडशे रुपयात चिपळूण ते मुंबईचा प्रवास करतात. एक्सप्रेस गाडीने प्रवास करण्याकरता अधिक पैसे मोजावे लागत आहेत. नाइलाजास्तव प्रवासी पदरमोड करून रेल्वेने प्रवास करत आहेत; मात्र पॅसेंजरसाठी रेल्वे प्रशासनाचा अजूनही रेड सिग्नल आहे. दोन वर्षाहून अधिक काळ पॅसेंजर गाड्या बंद आहेत. त्यामध्ये रत्नागिरी-दादर आणि दिवा-सावंतवाडी या गाड्यांचा समावेश आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:47 PM 29-Oct-21
