‘हिंमत असेल तर नारायण राणेंनी…’; खा. विनायक राऊतांचं जाहीर आव्हान

0

सिंधुदुर्ग : सी वर्ल्ड आणि नाणार रिफायनरीच्या जागेवरून शिवसेना व नारायण राणे पुन्हा आमनेसामने आले आहेत. हे दोन्ही प्रकल्प आधी निश्चित झालेल्या जागेवरच होणार, त्यात कुठलाही बदल होणार नाही, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ठणकावलं आहे. मात्र, शिवसेनेनं या दोन्ही प्रकल्पांच्या जागेला कडाडून विरोध केला आहे. खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणें यांना जाहीर आव्हानच दिलं आहे. रत्नागिरी येथील राजापूर तालुक्यात नाणार येथे रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहेत. तर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वायंगणी, तोंडवळी परिसरात सी वर्ल्डसाठी जमीन संपादन केलं जाणार आहे. नाणार प्रकल्पाला स्थानिकांसह पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे, तर सी वर्ल्डमुळं विस्थापित व्हावं लागणार असल्यानं स्थानिकांनी नाराजीचा सूर लावला आहे. शिवसेनेनं दोन्ही ठिकाणी स्थानिकांची बाजू घेत प्रकल्पांना विरोध केला आहे. त्यामुळं शिवसेना व भाजपमध्ये पुन्हा वाकयुद्ध सुरू झालं आहे. ‘सी वर्ल्ड आणि नाणार हे दोन्ही प्रकल्प त्याच जागी होणार. कुठलाही संबंध नसताना कोणीही काही बोलत असेल तर त्याला काही अर्थ नाही,’ असा टोला राणे यांनी शिवसेनेला हाणला आहे. तर, प्रकल्पांच्या जागेला कडाडून विरोध करत विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली आहे. ‘नारायण राणे यांचा जीव ‘सी वर्ल्ड’मध्ये गुंतलेला आहे. हा प्रकल्प फक्त ३०० एकर जागेवर होणार आहे, पण त्यासाठी १४०० एकर जमीन खरेदी करून नातेवाईकांच्या नावावर हॉटेलं उभी करायची हा नारायण राणे यांचा धंदा आहे. मंत्री झाले असले तरी ते त्यापासून दूर गेलेले नाहीत. त्यांचा हा प्रयत्न चालूच रहाणार आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत गावं उद्ध्वस्त करून ‘सी वर्ल्ड’ होऊ देणार नाही,’ असं राऊत म्हणाले. नाणारच्या बाबतीतही राऊत यांनी राणेंवर सडकून टीका केली. ‘नाणार रिफायनरी होऊ नये म्हणून संपूर्ण देवगडमधून गाड्याच्या गाड्या भरून मोर्चे काढले होते. त्यावेळी राणेंनी नरेंद्र मोदी, अमित शहा व भाजप सरकारवर वाट्टेल ती टीका केली होती. आता सरकारमध्ये बसल्यानंतर त्यांना रिफायनरीचा कळवळा आलाय. पण हिंमत असेल तर त्यांनी रिफायनरीचा प्रस्ताव नारायण राणेंनी रेटून दाखवावा,’ असं आव्हान राऊत यांनी दिलं.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:21 PM 30-Oct-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here