रत्नागिरी : येथील ख्यातनाम डॉक्टर आणि जेष्ठ बॅडमिंटनपटू डॉ मुकुंद पानवलकर यांचे आज दुपारी २ च्या सुमारास दुःखद निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८३ होते. गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून त्यांची रत्नागिरीत ओळख होती. रत्नागिरी शहरात कान, नाक, घसा तद्न्य म्हणून आपल्या वैद्यकीय व्यवसायाला सुरुवात केली होती. अचूक निदान आणि अत्यंत कमी फी मध्ये त्यांनी खऱ्या अर्थाने रुग्णाची सेवाच केली. वयाच्या ८३ व्या वर्षपर्यंत त्यांनी आपला बॅडमिंटन खेळ चालू ठेवला होता. याच खेळामुळे तरुणांना लाजवेल अशी शरीरयष्टी त्यांना लाभली होती. डॉक्टरांची तंदुरुस्ती पाहून अनेकजण अवाक होत असत. भारतात व भारताबाहेर देखील त्यांनी बॅडमिंटनच्या अनेक स्पर्धातून भाग घेऊन उल्लेखनीय यश संपादन केले होते. त्यांना फुलझाडांची देखील खूप आवड होती. रत्नागिरी रोझ सोसायटीचे ते अध्यक्ष होते. याच छंदातून त्यांनी गुलाब मित्र हे पुस्तक देखील लिहिले होते. या वयात देखील त्यांनी आपल्या बागेमध्ये कंपोस्ट खत निर्मितीचा यशस्वी प्रयोग केला होता. आपले छंद जोपासत असताना त्यांनी समाजकार्यात देखील हिरहिरीने भाग घेतला. बाल सुधारगृहाचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी अनाथ मुलांसाठी आपले सर्वस्व वाहिले होते. आज सकाळीच त्यांच्या हस्ते एसव्हीएम विद्यालयातील बॅडमिंटन कोर्टचे उद्घाटन झाले. डॉ मुकुंद पानवलकर यांच्या जाण्याने जणूकाही माणसातला देवच देवाघरी गेला अशी प्रतिक्रिया उमटत आहे. डॉ. मुकुंद पानवलकर यांच्या पश्चात त्यांची पत्नी, दोन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दिनांक २ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० वाजता त्यांच्या घरातून अंत्ययात्रा निघणार असून चार्मालय स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
