मुंबई : शिवसेनेचा महाराष्ट्राच्या बाहेरील पहिला खासदार उद्या तुम्हाला पाहायला मिळेल, असा विश्वास शिवसेनेचे राज्यसभेतील खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. दादरा-नगर हवेली लोकसभा मतदारसंघात काल पोटनिवडणूक झाली. शिवसेनेनं ही निवडणूक लढवली असून त्यात शिवसेनेचा विजय निश्चित असल्याचं राऊत पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले. दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशातील लोकसभा मतदारसंघात काल पोटनिवडणूक पार पडली. त्या ठिकाणी असलेलं वातावरण पाहता कलाबेन डेलकर विजयी होतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राबाहेरचा शिवसेनेचा पहिला खासदार उद्या तुम्हाला पाहायला मिळेल, असं राऊत म्हणाले. भाजपच्या तिकिटावर २०१९ मध्ये विजयी झालेल्या मोहन डेलकर यांच्या निधनामुळे दादरा आणि नगर हवेलीत पोटनिवडणूक होत आहे. शिवसेनेनं मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन यांना उमेदवारी दिली आहे. तर भाजपनं माजी पोलीस उपनिरीक्षक महेश गावित यांनी रिंगणात उतरवलं आहे. तर काँग्रेसकडून माजी पोलीस हेड कॉन्स्टेबल मगेशी धोडी रिंगणात आहेत. दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काल मतदान झालं. एकूण ७६ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. २०१९ मध्ये या मतदारसंघात ७९.५९ टक्के मतदान झालं. उद्या या ठिकाणी मतमोजणी होईल.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:02 PM 01-Nov-21
