रत्नागिरी : दिवाळी शुभेच्छा देणारे फलक संपूर्ण शहरात एका राजकीय पक्षाकडून झळकवण्यात आले आहेत. या फलकांवर पक्षातील प्रत्येक नेत्याला स्थान देताना युवा नेत्याला मात्र जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची चर्चा शहरात सुरू आहे. राज्यातील एका उच्च नेत्याच्या मार्गदर्शनाखाली हा युवा धनुष्यबाण हाती घेण्याच्या तयारीत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
या युवा नेत्याच्या खांद्यावर नुकतीच युवकांचा मोर्चा सांभाळण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जबाबदारी मिळताच आता आपणच विधानसभा निवडणुकीचे उमेदवार असल्याच्या स्वप्नात रंगलेल्या या युवा नेत्याला त्याच्याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी कात्रजचा घाट दाखवला आहे. शहरात दिवाळी शुभेच्छा देणारे फलक या पक्षाकडून लावण्यात आले असले तरी या फलकांवर या युवा नेत्याला स्थान देण्यात आलेले नाही. पद मिळाल्यानंतर या युवा नेत्याच्या विरोधात प्रचंड तक्रारी करण्यात आल्या आहेत. या युवा नेत्याने धनुष्यबाण हाती घेण्यासाठी देखील चाचपणी केल्याची चर्चा असल्याने दिवाळी शुभेच्छा फलकांवर या युवा नेत्याला स्थान दिले नसल्याची माहिती त्याच्याच पक्षातील एका जेष्ठ नेत्याने दिली आहे.
