कोकणात दहा महिन्यांत ११२ लाचखोर गजाआड

0

ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) वतीने कोकण परिक्षेत्रात राबवण्यात आलेल्या कारवाईत १ जानेवारी ते २७ ऑक्टोबर २०२१ या कालावधीत एकूण ६७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्ह्यातील ११२ लाचखोर आरोपींना गजाआड व्हावे लागले आहे. ठाणे, पालघर, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आदी सहा जिल्ह्यांचा कोकण परिक्षेत्रात समावेश होतो. या सहा विभागांतून सर्वाधिक ३० गुन्हे ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. तर त्यापाठोपाठ पालघर विभागात १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नवी मुंबईत ११ तर रायगडमध्ये ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहा महिन्यांत तीन तर रत्नागिरीत केवळ एक लाचखोरीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भ्रष्टाचाराला आळा बसावा म्हणून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अनेक विधाय पाऊले उचलण्यात येत आहेत. तसेच जनजागृती उपक्रम देखील राबविले जात आहेत. राज्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने २६ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त ठाणे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे जिल्ह्यातील राज्य सरकारचे विभाग, सहकारी संस्था व स्वायत्त संस्था तसेच सर्वसामान्य नागरिक यांच्यात या संदर्भात जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांनी दिली. दरम्यान, सध्या राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने मास्क लावून आणि सामाजिक अंतर पाळून हा कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याचे देखील एसीबी विभागाने स्पष्ट केले आहे. दरम्यान, जनजागृती मोहीम राबवण्याबरोबरच एसीबी पथकाने प्रत्यक्ष करवाईवर देखील भर दिला आहे. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (कोकण परिक्षेत्र) कारवाईत गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. २०२० या वर्षीच्या जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत ठाणे विभागाकडून एकूण ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर यंदा २०२१ मध्ये ठाणे (कोकण) परिक्षेत्रात २७ ऑक्टोबर पर्यंत एकूण ६६ सापळे लावण्यात आले असून एक असंपदेचा गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्व प्रकरणात एकूण ११२ लाचखोर आरोपींना गजाआड करण्यात आले. कोकण परिक्षेत्रातील सहा जिल्ह्यांपैकी सर्वाधिक लाचखोर ठाण्यातून अटक करण्यात आले आहेत. ठाण्यात आता पर्यंत एकूण ३० लाचखोरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापाठोपाठ पालघर विभागात १२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर नवी मंबई ११ आणि रायगड ९. रत्नागिरीत १आणि सिंधुदुर्गमध्ये ३गुन्हे नोंद करण्यात आले आहे.कोरोनाचा प्रार्दुभाव कमी झाल्याने शिथिल करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोकण विभागात सापळा कारवाईत २९ गुन्ह्याची वाढ नोंदवण्यात आल्याची माहिती एसीबी सूत्रांनी दिली. यंदा देखील लाचखोरीत महसूल, भूमी अभिलेख आणि नोंदणी विभाग अव्वल क्रमांकावर राहिला असून त्यापाठोपाठ पोलीस खात्याचा क्रमांक लागतो.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:59 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here