मुंबई : नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वादानंतर आता राज्याच्या राजकारणात नवाब मलिक विरुद्ध देवेंद्र फडणवीस असा सामना रंगण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या आरोपांना उत्तर देताना फडणवीस यांनी दिवाळीनंतर ‘बॉम्ब’ फोडण्याचा इशारा दिला आहे, तर, मलिक यांनीही फडणवीसांना तात्काळ उत्तर देताना त्यांचं आव्हान स्वीकारलं आहे. अमली पदार्थांना आळा घालण्यासाठी राज्यात सुरू असलेल्या एनसीबीच्या कारवाया हा एक राजकीय खेळ असून त्याचे सूत्रधार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांचे ड्रग पेडलरशी संबंध आहेत. समीर वानखेडे यांची बदली एनसीबीमध्ये करण्यामागेही फडणवीसांचाच हात होता, असा आरोप करून मलिक यांनी आज खळबळ उडवून दिली. नवाब मलिक यांच्या आरोपांना फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर उत्तर दिलं. नवाब मलिक यांचे आरोप हास्यास्पद आहेत, असं सांगत फडणवीस यांनीच मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत. त्याचे पुरावे मी मीडियासमोर मांडणार आहेच, पण शरद पवारांनाही देणार आहेत. हे पुरावे असे आहेत की त्याची चौकशी करावीच लागेल. त्यामुळं दिवाळी संपेपर्यंत थांबा. बॉम्ब फोडणार आहे,’ असं फडणवीस म्हणाले. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मलिक यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्वीट केलं आहे. ‘है तैयार हम’ असं मलिक यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांना टॅगही केलं आहे. त्यामुळं दिवाळीनंतर पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडणार, अशी चिन्हं आहेत.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 01-Nov-21
