तुमच्या वडिलांनी ‘ही’ वेळ आणलीय; चित्रा वाघ यांचं मंत्री आदित्य ठाकरेंना खरमरीत पत्र

0

मुंबई : राज्यात एकीकडे ड्रग्स प्रकरणावरुन नवाब मलिकांनी विरोधी पक्ष भाजपावर गंभीर आरोप लावले आहेत. तर दुसरीकडे आरोग्य विभागाने घेतलेल्या परीक्षेत सावळागोंधळ दिसून येत असल्याने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहित ठाकरे सरकारवर घणाघात केला आहे. चित्रा वाघ यांनी पत्रात आदित्य ठाकरे यांना ४ प्रश्न विचारले आहेत. सरकारच्या भोंगळ कारभारानं विद्यार्थ्यांचं स्वप्न धुळीस मिळाल्याचं त्या म्हणाल्या. राज्यातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पाठवा. कारण ते तुमच्याशिवाय कुणाचंही ऐकत नाही. त्यामुळे वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावं असं आवाहनही चित्रा वाघ यांनी आदित्य ठाकरेंना केले आहे.

HTML tutorial

चित्रा वाघ यांनी लिहिलेलं पत्र वाचा जसं आहे तसं…

मा. आदित्य ठाकरेजी,

खरंतर तुम्हाला पत्र लिहून विद्यार्थ्यांची व्यथा मांडण्याची गरज नव्हती. परंतु तुमच्या वडिलांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीच ही वेळ आणली आहे. त्यांना तुमच्या शिवाय कोणाची चिंता नाही. तुमच्याशिवाय कोणाचं ऐकत नाहीत म्हणून तुमच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना विनंती करते आहे. वास्तविक मुलाच्या भवितव्यासाठी वडील किती कष्ट घेतात हे तुम्हाला चांगलेच माहिती आहे. तुमचे वडील स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री झाले. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आल्यावर मात्र ते गप्प बसलेत. तेही जेव्हा विद्यार्थ्यांचे स्वप्न धुळीस मिळत आहे.

मागील काही दिवसांपासून मी सातत्याने आरोग्य विभागाच्या परीक्षेतील गोंधळ त्यांच्या निदर्शनास आणून दिला. परंतु त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. राज्यातील जनतेचे असंख्य विद्यार्थ्यांचे पालक आहेत. हा विसर त्यांना कसा काय पडू शकतो. असो. आज पाचव्यांदा आरोग्य विभागाचा पेपर फुटला आहे. यावर माझे काही प्रश्न आहेत.

  1. न्यासा एजन्सीची चौकशी का लावली नाही?
  2. एजन्सीला ब्लॅक लिस्टमध्ये का टाकलं नाही?
  3. एजन्सीला परीक्षेचा अनुभव नसताना कंत्राट का दिले गेले?
  4. MPSC सारखी विश्वासार्ह संस्था असताना न्याया एजन्सीच का निवडली?

या प्रश्नांची उत्तरं सरकारने द्यावी. खरंतर ४ वेळा ठेच लागूनही पुन्हा पाचव्यांदा परीक्षा घेण्याची जबाबदारी त्याच एजन्सीकडे कशी काय दिली जाऊ शकते? यात तिन्ही पक्षात काही साटंलोटं झालंय का असा याचा संशय येतो. आपण राज्यभरातील विद्यार्थ्यांचा आक्रोश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचवाल आणि वाघ डरकाळी फोडू शकतो हे दाखवून द्यावं असं आवाहन चित्रा वाघ यांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 01-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here