लांजा : कयार चक्रीवादळामध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाकडून आलेल्या नुकसान भरपाईसाठी खोटे दस्तऐवज तयार करून अनुदान लाटण्याच्या हेतूने कोंडगे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच आणि शिपायावर लांजा तहसीलदार यांनी दंडात्मक कारवाई करून लाटलेली रक्कम वसूल केली आहे. सन २००९ मध्ये कयार चक्रीवादळ आले होते. यामध्ये शेतकऱ्यांच्या भात पिकाचे तसेच अनेक ठिकाणी घरांची मोठी पडझड झाली होती. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर झाली होती. याचाच फायदा घेत स्वतःच्या सातबाऱ्यावर भात पिकाची खोटी नोंद करून कोंडगे गावचे ग्राम पंचायतीचे सरपंच तानाजी जाधव व शिपाई रमाकांत नाटेकर यांनी हे अनुदान लाटले होते. या प्रकरणाबाबत अनंत कदम यांनी सातत्याने पाठपुरावा करून लांजा तहसीलदार यांच्याकडे खोटे अनुदान लाटले असल्याबाबतची तक्रार केली होती. तब्बल पाच महिने तक्रार करूनदेखील लांजा तहसील कार्यालयातील प्रशासनाने याची साधी दखलदेखील घेतली नसल्याने अखेर त्यांनी याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांना तक्रार करून कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून निवासी उपजिल्हाधिकारी यांनी लांजा तहसीलदार यांना तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी गटविकास अधिकारी यांना चौकशीचे आदेश देऊन संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याप्रकरणी लांजा तहसीलदार यांनी या प्रकरणाची चौकशी केली असता असे निष्पन्न झाले की कोंडगे ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच तानाजी जाधव आणि शिपाई रमाकांत नाटेकर यांनी या प्रकरणांमध्ये गैरव्यवहार केला असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून लाटलेले अनुदान रक्कम वसूल केली आहे.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 01-Nov-21
