जिल्ह्यातील महिला बचतगट बनणार स्मार्ट; आता महिला बचत गटही ‘गुगल पे’ वर

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील महिला बचतगटांना स्मार्ट बनवण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून विक्री यंत्रणेविषयी महिला मार्गदर्शन केले जात असून डिजिटल पेमेंटसाठी गुगल पेचा क्युआर कोड गटांना बनवून देण्यात आला आहे, अशी माहिती जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी दिली. मारुती मंदिर येथे महोत्सवाच्या ठिकाणी आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक नंदिनी घाणेकर, श्री. गमरे, श्रीमती बोरकर उपस्थित होते. डॉ. जाखड म्हणाल्या की, महोत्सवात जिल्ह्यातील ५५ प्रभाग संघाचे स्टॉल सहभागी आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बचत गटांनी बनवलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या होत्या. यामध्ये बांबूपासून तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू, हाताने विणकाम केलेल्या वस्तू, हँडमेड आकर्षक गोधड्या, नाचणीपासून तयार केलेले विविध पदार्थ, नाचणी बिस्कीट, नाचणी सत्व, नाचणी लाडू, नाचणी शंकरपाळी, नाचणी शेव, नाचणी नानकेट, मेथी लाडू, बेसन लाडू या दिवाळीत रत्नागिरी करांच्या सेवेत स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी तयार केलेला भेसळमुक्त दिवाळी फराळ, चिवडा, लाडू, शंकरपाळी, चकली, करंज्या, बोरं, चिरोटे व त्याचप्रमाणे पर्यावरणपूरक हैंडमेड आकाश कंदील, विविध प्रकारचे मसाले, पीठं याची लज्जतदार मेजवानी या प्रदर्शनात उपलब्ध आहे. महिलांनी आंब्यापासून तयार केलेले विविध उत्पादने, काजूपासून तयार केलेली विविध उत्पादने, काजूगर, आमरस, कोकणी मेवा यासारखे असंख्य उत्पादने विक्रीसाठी माफक दरात आहेत. येथे शाकाहारी व मांसाहारी आणि मत्स्याहारी या पद्धतीने तयार केलेले रुचकर जेवणाचे फूड कोर्ट आहे. त्यात चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, चिकन-६५, मटन थाळी, प्रान्झ फाय, चिकन वडे, मटण वडे, चिकन भाकरी, चिकन मोमोज,
चिकन कोरमा, चिकन शोरमा आहे. ग्रामीण व घरगुती चव चाखण्याची सुवर्णसंधी सरस प्रदर्शनाच्या निमित्ताने उपलब्ध सरस प्रदर्शनाच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल आहे. डॉ. जाखड म्हणाल्या, कोरोनामुळे बऱ्याचशा बचत गटांचे कामकाज थांबले होते. स्थानिक बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वन स्टॉप फॅसिलीट सेंटरच्या धर्तीवर उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. बहुतांश बचत गट एकच पदार्थ बनवितात. वेगवेगळ पदार्थ तयार करुन त्याला मार्केट कसे मिळवून देता येईल, या दृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. त्यासाठी महिला बचत गटांची को ऑपरेटीव्ही सोयायटी बनविण्यात येणार आहे. त्या मार्फत मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या बाजारपेठांमध्ये बचत गटांच्या विक्रीची यंत्रणा उभारण्यात येईल. पदार्थ बनविण्यासाठी अनेक शासकीय ठेके दिले जातात. त्याची निविदा सोसायटीमार्फत भरणेही शक्य होईल. शासनाकडून अनुदान आणि कमी व्याजदारात कर्जही घेता येणार आहे. या पध्दतीने तामिळनाडू, कर्नाटकमध्ये बचत गट काम करत आहेत. आधुनिक प्रणालीच्या माध्यमातून विक्री यंत्रणेविषयी महिला मार्गदर्शन केले जात असल्याचे सांगताना डॉ. जाखड म्हणाल्या की, डिजिटल पेमेंटसाठी गुगल पेचा क्युआर कोड गटांना बनवून देण्यात आला आहे. अॅम झोनमार्फतही उत्पादनांची विक्री केली गेली; परंतु त्यांचे कमिशन अधिक असल्याने गटांना त्यामधून फायदा होत नाही. कमी कमिशन घेणाऱ्या विक्री यंत्रणांचा शोध सुरु असून कोकण डिल या नवीन विक्री संस्थेशी करार करण्यात येणार आहे. शासनाने वेबसाईटच्या माध्यमातून विक्रीचे नवे दालन सुरु केले आहे. त्याचा प्रयोग अहमदनगर, पुणे येथे यशस्वी झाला आहे. त्याच वेबसाईटच्या माध्यमातून लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील बचतगटांच्या मालाची विक्री केली जाणार आहे.

HTML tutorial

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:19 PM 01-No
v-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here