नवसाला पावणारी अशी ख्याती राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचलेल्या मालवण तालुक्यातील बिळवस आंगणेवाडी येथील भराडी देवीच्या यात्रोत्सवात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष भास्कर आंगणे यांच्या हस्ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे स्वागत सत्कार करण्यात आले. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, आमदार दीपक केसरकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. आंगणेवाडी मंडळ आणि प्रशासन यांच्याकडून भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी व्यवस्था करण्यात आली होती. यात्रेसाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला होता. आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांच्या आरासाने मंदिर परिसर झळाळून गेला. शेकडो दुकानांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली. मंगळवारी मोडयात्रेने यात्रोत्सवाची सांगता होणार आहे.
