जिल्ह्यात पर्यटकांचा ओघ वाढला; एमटीडीसीची निवासस्थाने फुल्ल

0

रत्नागिरी : कोरोनाचे नियम शिथिल झाल्यामुळे दिवाळी सुट्टीत कोकणातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची मोठी गर्दी होणार आहे. गणपतीपुळेतील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची निवासस्थानांचे ऑनलाईन आरक्षण फुल्ल झाले असून हॉटेलमध्येही प्रचंड गर्दी होणार आहे. याच कालावधीत समुद्रातील बोटींगलाही परवानगी मिळाली असून गणपतीपुळेतील बोटींग व्यवसायिकांनी आरंभ केला आहे. त्यामुळे पर्यटकांना समुद्रात बोटींगचा थरार अनुभवता येणार आहे. कोरोना आणि बिघडलेले वातावरण यामुळे ऑक्टोबर महिन्यात पाण्यातील क्रिडा प्रकारांना परवानगी देण्यात आलेली नव्हती. यासाठी बोटींग क्लब चालवणार्‍यांनी प्रशासनाबरोबर चर्चाही केली होती. महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाची परवानगी घेऊन बोटींग चालवता येईल अशा सुचना प्रशासनाकडून मिळाल्या होत्या. जिल्ह्यात गणपतीपुळे, गुहागर, दापोली आणि आरे-वारे येथील किनार्‍यांवर वॉटर स्पोर्टस्चा अनुभव पर्यटकांना घेण्याची संधी मिळते. गणपतीपुळेत 17 बोटी असून त्यामधून शंभरहून अधिक लोकांना रोजगार मिळतो. दसर्‍याच्या मुहूर्तावर मंदिरे दर्शनासाठी खुली केल्यानंतर पर्यटकांची पावले आपसूकच पर्यटन किनारी वळली होती. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांचा राबता वाढलेला होता. परंतु या कालावधीत समुद्र खवळलेला असल्यामुळे बोटींग करणे शक्य नव्हते. काही परवानग्याही मिळालेल्या नसल्याने हा हंगाम व्यावसायिकांना मिळाला नव्हता. दिवाळीच्या सुट्टीत गणपतीपुळेसह कोकणातील बहूतांश पर्यटन स्थळांवर मोठ्याप्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. गणपतीपुळेतील लॉजिंग व्यावसायिकांनीही 4 नोव्हेंबरपासून पर्यटकांचा राबता वाढणार असल्याचे सांगितले आहे. किनारी भागात आलेला पर्यटक समुद्रात बोटींगकडे वळतो. दोन दिवसांपुर्वी बोटींगला सुरवात झाली आहे. सध्या पर्यटकांची तुरळक उपस्थिती आहे. एखादाच पर्यटक जेट स्की किंवा बोटींगचा थरार अनुभवण्यासाठी सरसावत आहे. दिवाळीच्या पहिल्या दिवसानंतर पर्यटकांची गर्दी वाढणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:12 PM 02-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here