शरद पवारांचं एसटी कामगारांना कळकळीचं आवाहन; म्हणाले…

0

बारामती : एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी एसटी कामगार संघटनांनी ऐन दिवाळीत संपाचं हत्यार उपसलं आहे. मुंबई उच्च न्यायालयानं मनाई आदेश जारी केल्यानंतरही काही प्रमाणात संप सुरू असल्यानं कोर्टानं कामगार नेते अजयकुमार गुजर यांना नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज एसटी कामगारांना कामावर परतण्याचं आवाहन केलं. बारामती इथं दिवाळीच्या निमित्तानं संपूर्ण पवार कुटुंब एकत्र आलं आहे. या कार्यक्रमाप्रसंगी शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. पेट्रोल-डिझेलच्या किंमती, ईडीच्या धाडी, अजित पवारांची दिवाळी कार्यक्रमाला अनुपस्थिती या सर्व प्रश्नांची पवारांनी उत्तर दिली. एसटीच्या संपावरही त्यांनी भाष्य केलं. ‘एसटी कामगार आणि सरकारची चर्चा कुठपर्यंत आलीय याची मला माहिती नाही. त्यासाठी मला सरकारमधील लोकांशी बोलावं लागेल. पण एसटी कामगारांची संघटना खऱ्या अर्थानं ज्यांच्या हाती आहे, त्यातील काही लोक मला काल भेटले. दिवाळीसारख्या सणाच्या काळात हा संप पुढं नेण्याची आम्हालाही इच्छा नाही. एसटी संकटात आहे याची आम्हाला जाणीव आहे. पण लोकांना त्रास देणं योग्य नाही असं आमचं मत आहे. काही लोकांनी टोकाची भूमिका घेतलीय, त्यामुळं हे सगळं घडतंय,’ असं पवार म्हणाले. ‘सध्या ८० ते ८५ टक्के एसटी रस्त्यावर आहे. १५ ते २० टक्के काही ठिकाणी बंद आहे. एसटी कामगारांनी संस्थेच्या हितासाठी व लोकांची सेवा सुरू ठेवण्यासाठी फार ताणू नये. न्यायालयानंही हा संप कायदेशीर नाही अशी भूमिका घेतली आहे. न्यायालयाचा आदर ठेवून हा विषय संपवावा,’ असं आवाहन शरद पवार यांनी केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 05-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here