आंगणेवाडी यात्रोत्सवाची आज मोडयात्रेने सांगता

0

आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवाची सांगता आज मोडयात्रेने झाली. यात्रोत्सवात लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. सोमवारी रात्रौ यात्रोत्सवात गर्दीचा उच्चांक दिसून आला. मध्यरात्री देवालयात देवीच्या प्रसादाची ताटे लावण्याचा लक्षवेधी सोहळा भक्तांनी डोळ्यात साठवला. आज यात्रेच्या दुसऱ्या दिवशी आंगणे कुटुंबीयांच्या मानाच्या ओट्यांसह हजारो भाविक व पुढाऱ्यांनी देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरापर्यंत गर्दीचा ओघ कायम होता. आंगणे कुटुंबिय, ग्रामस्थ मंडळ, प्रशासन यांच्या सुयोग्य नियोजनामुळे यात्रोत्सव यशस्वी झाला. आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवात रात्री देवीला प्रसाद (ताटे) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली. जय जय भराडी देवीच्या गजरात देवीच्या प्रसादाची ताटे आंगणे कुटुंबातील महिलांनी डोक्यावर घेत देवालयात आणली. यावेळी 9 ते 1 वाजेपर्यंत देवीचे दर्शन बंद होते. यात्रा परिसरात भाविकांची सर्वाधिक गर्दी दिसून आली. महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर प्रतीवर्षाप्रमाणे अनेक भाविकांनी आंगणे कुटुंबियांच्या घरी प्रसाद घेतला. धार्मिक कार्यक्रम झाल्यानंतर मध्यरात्री देवीचे दर्शन पुन्हा सुरू झाले. त्यांनतर पुन्हा दर्शनासाठी रांगा दिसून आल्या. श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. विद्युत रोषणाईने झळाळून निघालेले मंदिर साऱ्याचे लक्ष वेधून घेत होते. मंदिरात फुलांची आरास व मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई लक्ष वेधून घेत होती. मंदिर विद्युत रोषणाई व यात्रा गर्दी मोबाईलमध्ये सेल्फी घेण्याची लगबग युवा वर्गात दिसून आली. यात्रा परिसरातील चलचित्र देखावा साऱ्याचे लक्ष वेधून घेत होता. गजबजलेली खाजा-मिठाईची दुकाने, बच्चे कंपनीसाठी ‘मौत का कुव्वा’, फनी गेम, आकाश पाळणा, फायर शूट, व अन्य गेम ठिकाणी मोठी गर्दी होती. आंगणे कुटुंबियांच्या घरी असलेल्या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती. मंगळवारी यात्रेत शेती अवजारे, चादरी व खाजा घेण्यास भाविकांची गर्दी होती. यात्रा यशस्वी होण्यासाठी जिल्हा, तालुका, पंचायत समिती व ग्रामपंचायत प्रशासन, पोलीस, महसूल, आरोग्य, विज, बस, अन्य प्रशासन तसेच आंगणेवाडी मंडळ व सर्व आंगणे परिवाराने परिश्रम घेतले. आंगणेवाडी यात्रेत भराडी देवीच्या यात्रेस येणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे यासाठी आंगणे कुटुंबीय नियोजनात व्यस्त असतात. त्यामुळे प्रथम भाविकांना नंतर आंगणे कुटुंब या प्रथेप्रमाणे यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मुंबई, पुणे व अन्य प्रांतातील आंगणेबांधव यासह स्थानिक आंगणेवासियांनी भाविकांसोबत रांगेत उभे राहून देवी भराडी देवीचे दर्शन घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here