रत्नागिरी च्या सहकार, साहित्य, सांस्कृतिक चळवळीसोबतच भारतीय जनता पार्टीच्या राजकीय वाटचालीत सक्रिय असलेले अॅड. दीपक पटवर्धन यांची भाजप जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शनिवार दि ३ ऑगस्ट रोजी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
अॅड. दीपक पटवर्धन हे व्यक्तिमत्व सर्व परिचित आहे ते वेगवेगळ्या क्षेत्रातील त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे! प्रसिद्ध वकील म्हणून स्वतःची ओळख निर्माण करत असतानाच त्यांनी रत्नागिरीतील सहकार क्षेत्रात प्रवेश केला. आपल्या सहकाऱ्यांसह स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची स्थापना केली. आज ही पतसंस्था राज्यातील अग्रणी पतसंस्था ठरली असून अॅड. पटवर्धन यांच्या कल्पक नेतृत्वामुळे १८० कोटी ठेवींच्या घरात पोहोचली आहे. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असो किंवा जिल्ह्यातील गृहनिर्माण संस्थांची चळवळ असो अॅड.पटवर्धन यांनी तेथेही आपल्या कार्याने आपले नाव ठळक नमूद केले आहे. एकीकडे समाजकारण, राजकारण करतानाच त्यांनी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय या राज्यातील सर्वात जुन्या वाचनालयाचे अध्यक्षपद स्वीकारले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली वाचनालयाच्या माध्यमातून वाचन चळवळ वृद्धिंगत होत गेली आहे.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून रत्नागिरीतील राजकीय क्षेत्रातही अॅड. दीपक पटवर्धन यांच्या नावाचा दबदबा आहे. एकीकडे भाजप जिल्ह्यात नव्याने उभा राहत असताना पक्षाने बदलत्या काळाची पावले ओळखत दीपक पटवर्धन यांच्याकडे जिल्ह्याचे नेतृत सोपवले आहे.
अॅड. पटवर्धन यांच्या या कर्तृत्वचे कौतुक त्यांच्या विविध क्षेत्रातील स्नेही, मित्रमंडळी याना आहे. आपल्या सुहृदचे कौतुक करण्यासाठी ही सर्व मित्रमंडळी, हितचिंतक एकत्र येऊन शनिवार दि ३ ऑगस्ट २०१९ रोजी अॅड. दीपक पटवर्धन यांचा सत्कार करणार असून या निमित्ताने स्नेहमेळावा होणार आहे. हा विशेष कार्यक्रम शहरातील स्वयंवर मंगल कार्यालयात सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. यावेळी उपस्थित राहावे आणि अॅड.पटवर्धन यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा द्याव्या असे आवाहन त्यांच्या स्नेही, मित्रमंडळी यानी केले आहे.
