जिल्ह्यात ६९ टक्के महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण

0

रत्नागिरी : महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे कोरोनाप्रतिबंधक लसीकरण करून घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून मिशन ‘युवा स्वास्थ्य मिशन’ राबविण्यात आले होते. त्याला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळाला. आतापर्यंत ६९ टक्के विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे दिवाळीनंतर जिल्ह्यातील ८१ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढणार आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार पालकमंत्री अनिल परब, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, उपाध्यक्ष उदय बने, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी केलेल्या आवाहनानुसार संपूर्ण जिल्हयात २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबविण्यात आले होते. शासनाकडून करोनाप्रतिबंधक डोसचा पुरवठा वाढला असून लसीकरणात दररोज वाढ होत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. दिवाळीच्या सुट्टीनंतर ती पुन्हा सुरू होतील. दरम्यानच्या काळात लसीकरणाअभावी उपस्थितीवर परिणाम झाला होता. हे लक्षात येताच सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मिशन युवा स्वास्थ्य अभियान राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे आणि १८ वर्षे वयोगटावरील तरुणांचे लसीकरण सुरू करण्यात आले. जिल्ह्यातील ८१ महाविद्यालयांमधील एकूण ९ हजार ७६३ जणांपैकी ६ हजार ४१७ जणांचे लसीकरण पूर्ण झाले. त्यात ५ हजार २२७ विद्यार्थी, ७३९ शिक्षक आणि ४५१ सहायक कर्मचारी यांचा समावेश आहे. उर्वरित लाभार्थ्यांचे लसीकरण लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. जिल्हयात आतापर्यंत ९ लाख २५ हजार ४६ जणांनी पहिला, तर ३ लाख ९५ हजार ६६४ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. डोस घेतलेल्यांची एकूण संख्या १३ लाख २० हजार ७१० झाली आहे. त्यामध्ये महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या उपस्थितीत वाढ होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:35 PM 10-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here