रत्नागिरी: राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ठप्प झालेल्या प्रशासन, कारभाराविरोधात जाब विचारण्यासाठी रत्नागिरी भाजप 25 फेब्रुवारीला धरणे आंदोलन करणार आहे. महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. आंबाभाव स्थानिकांनी निसर्गाचा बसलेल्या फटक्यामुळे द्यायच्या व्याजसवलतीबाबत महाआघाडी शासन कार्यवाही करण्यास कुचराई करत आहे. रत्नागिरीमध्ये येणार्या औद्योगिक प्रकल्पांना जाणीवपूर्वक विरोध करून स्थानिक युवकांना देशोधडीला लावण्याचे काम शिवसेना शासन करत आहे, याविरोधात जाब विचारण्यासाठी धरणे धरू अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली. प्रदेश भाजपच्या बैठकीत महाआघाडी शासनाच्या कारभाराची चिरफाड करण्यात आली. नागरिकांचे प्रश्न प्रामुख्याने शेतकर्यांची कर्जमाफी तसेच ठप्प झालेली विकासकामे याला तिघाडी सरकार जबाबदार आहे. त्यामुळे जनतेचा वाढलेला क्षोभ शासनापर्यंत पोहोचवून शासनाला जाब विचारावा, यासाठी 25 ला धरणे आंदोलन घोषित केले आहे. महाराष्ट्रात भाजपतर्फे एकाच दिवशी आंदोलन करण्यात येणार आहे. रत्नागिरी भाजप पूर्ण ताकदीने धरणे करणार असल्याचे अॅड. पटवर्धन यांनी सांगितले. महायुतीला भरघोस बहुमत देऊन देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री व्हावेत व महायुतीचे शासन परत विराजमान व्हावे या जनभावनेला तडा देत विश्वासघात करून असंगाशी संग करणार्या आणि कोणताही आधार नसलेल्या व आत्मा हरवलेल्या शासनाचा कारभारही अत्यंत धिम्या गतीने सुरू असून त्यामुळे जनता त्रस्त आहे. या सर्व गंभीर परिस्थितीबाबत प्रखर विरोधी प्रश्न म्हणून भाजपने धरणे आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. या माध्यमातून महाआघाडी सरकारला जाब विचारण्यात येणार आहे. हे आंदोलन जनतेच्या असंतोषाचे प्रतीक असेल. या आंदोलनामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाचा निषेध नोंदवणार आहेत.
