संपामुळे एसटीचे दररोज १३ कोटींचे नुकसान; राज्यातील सर्व आगार बंद

0

मुंबई : कोरोनामुळे आधीच आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाचा गाडा पूर्वपदावर येत असतानाच ऐन ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटीचे दररोज १३ कोटींचे नुकसान होत आहे. या संपामुळे एसटीचा संचित तोटा हा तब्बल साडेबारा हजार कोटींपर्यंत पोहोचला आहे. तर कर्मचारी संपामुळे बुधवारी एसटीचे २५० पैकी २५० आगार बंद होते. राज्याची जीवनवाहिनी म्हणून एसटी ओळखली जाते. देशव्यापी लॉकडाऊननंतर अनलॉक काळात एसटी गाड्यांची वाहतूक पूर्वपदावर येत असतानाच पुन्हा संपाची झळ बसली. कोरोनापूर्वी एसटी महामंडळाचा ४,५४९ कोटी रुपयांचा तोटा होता. मात्र एसटीला कोरोनाकाळात तिकीट विक्रीतून मिळणाऱ्या हक्काच्या ३,८०० कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले. त्यामुळे एसटीचा तोटा वाढला.
कोरोनामुळे गेल्या दीड वर्षात एसटीला जवळ जवळ ७,९५१ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. त्यात आता संपामुळे एसटी महामंडळाचा संचित तोट्याचा आकडा हा साडेबारा हजार कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचलेला आहे. ऐन दिवाळीत एसटी कर्मचाऱ्यांनी केलेला संप आता चांगलाच चिघळला असून राज्यात बुधवारी दिवसभरात २५० आगारांपैकी २५० आगार बंद पडले आहेत. ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर गेल्याने सरासरी १०० कोटी रुपयांचा फटका एसटीला बसला. तर संपामुळे दररोज १३ कोटी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागले आहे.
एसटी महामंडळाला दर वर्षी प्रवासी उत्पन्न व इतर उत्पन्नाचे स्रोत धरून फक्त ७,८०० कोटी इतके उत्पन्न मिळते. तर कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनावर वर्षाला ३,५०० कोटी रुपये खर्च होतो. तर साधारणतः इंधनावर तीन हजार आणि स्पेअर पार्ट आणि टायरला साधारण ६०० कोटी इतका खर्च येतो.
गेल्या काही वर्षांपासून एसटीच्या प्रवासी संख्येत घट होत असल्याने एसटीचा संचित तोटा वाढत आहे. एसटी महामंडळाचा संचित तोटा हा २०१४-२०१५ आर्थिक वर्षात १,६८५ कोटी रुपये होता. नंतर प्रत्येक वर्षी हा तोटा हळूहळू वाढत गेला आहे. २०१८-१९ आर्थिक वर्षांत ४,५४९ कोटींवर पोहोचला होता. २०२०-२१ या आर्थिक वर्षांत कोरोनामुळे हा तोटा १२ हजार कोटींच्या घरात पोहोचला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:41 PM 11-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here