एसटीच्या संपाने ‘वडाप’धारकांची मनधरणी करण्याची शासकीय यंत्रणेवर वेळ

0

रत्नागिरी : अवैध प्रवासी वाहतुकीला (वडाप) प्रतिबंध घालणाऱ्या शासनासह आरटीओ, पोलिस, एसटी अधिकारीच खासगी वाहनांमध्येच प्रवाशांना बसण्यासाठी प्रोत्साहित करत असल्याचे विचित्र चित्र जिल्हाभरात दिसत होते. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाने शासकीय यंत्रणांवर ही वेळ आणली आहे. जिल्ह्यात प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी शासनाच्या आदेशाने आगारनिहाय संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करून मिनी बस, बस, कॉन्ट्रॅक्ट कॅरिज, स्कूल बस, मोटार, रिक्षा आदी ८६४ वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक करण्यात आली. मात्र एसटीएवढेच भाडे आकारण्याचे बंधन होते. संपामुळे प्रवाशांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये यासाठी प्रत्येक आगारात प्रशासनाकडून संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. याविषयी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी मडळांतर्गत येणाऱ्या नऊ एसटी डेपोमध्ये प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी खासगी बसेसची मदत, आवश्यक संरक्षण उपलब्ध व्हावे म्हणून पोलिस विभाग व होमगार्डची मदत तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिवहन विभाग पोलिस व एसटी विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली होती. संप सुरूच असल्याने बुधवारी झालेल्या बैठकीतून जिल्ह्यातील वाहतूक संघटना, खासगी बसेस, स्कूल बस यांच्याशी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी संपर्क साधला व या वेळी रिक्षा, मोटार, कॉन्ट्रॅक्ट कॅरिज ४९९ बस, स्कूल बस २६९ आणि खासगी ९६ बसेसच्या माध्यमातून प्रवाशांचा प्रवास गुरुवारी काहीसा सुकर झाला. शासनाने संप काळात मालवाहतूक वाहनांनादेखील प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी दिली असल्याचे मेडसीकर यांनी सांगितले. एरवी हिच शासकीय यंत्रणा खासगी अवैध वाहतुकीविरुद्ध रस्त्यावर उतरते. अक्षरशः पाठलाग करून वडापच्या गाड्यांवर कारवाई केली जाते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतुकीची कारवाई केली जाते. मात्र एसटीच्या संपाने याच वडापधारकांची मनधरणी करण्याची वेळ शासकीय यंत्रणेवर आली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 12-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here