चाफवली पोलिस पाटलाने जातीवाचक शिवीगाळ केल्याचा महिलेचा आरोप

0

संगमेश्वर : तालुक्यातील चाफवली बौध्दवाडीतील ललिता सुरेंद्र कांबळे या मच्छी विक्रेत्या महिलेला गावचे पोलिसपाटील यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप या महिलेने केला आहे. या बाबत या महिलेने पोलीस पाटलांविरोधात देवरूख पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. ललिता कांबळे (४६) ही महिला चाफवली बौद्धवाडीतील रहिवाशी असून ती गेली पंधरा ते सोळा वर्षे देवळे या बाजारपेठेमध्ये मच्छी व्यवसाय करीत आहे. ती २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वा. देवळे येथे मच्छी विक्री आली असता चाफवलीचे पोलिस पाटील विजय लक्ष्मण चाळके यांनी तुझ्या व तुझ्या नवऱ्याच्या नावाची तक्रार आहे, असे सांगितले. यावर या महिलेने विचारणा केली असता विजय चाळके यांनी तिला जातीवाचक अपशब्द वापरले. तसेच येथे तुला यापुढे कुठलाच धंदा करू देणार नाही असे सांगितले. या नंतर या महिलेने त्यांच्या घरी चाफवली येथे जावून त्यांच्या आई-वडिलांना झालेला सर्व प्रकार सांगितला. या वेळी विजय यांचा मोठा भाऊ संजय लक्ष्मण चाळके यांनी या महिलेच्या अंगावर धावत येत परत तशीच शिवीगाळ करायला सुरुवात केली आणि त्यांच्या आई वडिलांसमोर जातीवाचक शब्द वापरले. या प्रकरणी तातडीने कारवाई करण्यात यावी, असे पोलिसांना दिलेल्या तक्रार अर्जात नमूद करण्यात आले आहे. या तक्रार अर्जाची प्रत मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस अधीक्षक यांना या महिलेने पाठवली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:58 PM 12-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here