राजापूर मधील रुग्णवाहिका चालकांचा संप स्थगित, मानधन नसल्याने गैरसोय

0

राजापूर : तालुक्यातील ९ प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाकडून रुग्णवाहिका मिळाल्या खऱ्या मात्र गेल्या एप्रिलपासून वाहकांना शासनाकडून मानधनच मिळालेले नसल्याने त्यांनी काम थांबविले होते. मात्र, आरोग्य विभागाच्या मध्यस्तीनंतर शुक्रवारी सायंकाळी चार वाजल्यापासून सर्व रुग्णवाहिका चालकांनी आपला संप मागे घेतला व ते कामावर हजर झाल्याची माहिती येथील तालुका आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली. संपामुळे सर्व रुग्णवाहिका जाग्यावर होत्या. एखाद्या रुग्णाला अधिक उपचारासाठी पुढे कसे पाठवायचे? असा यक्षप्रश्न प्राथमिक आरोग्य केंद्रांपुढे उभा ठाकला होता. तालुक्यात ओणी, करक-कारवली, जवळेथर, जैतापूर, केळवली, फुफेरे, धारतळे, कुंभवडे आणि सोलगाव अशी नऊ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. गेल्या वर्षभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत असताना शासनाने सातत्याने झालेल्या मागणीची दखल घेऊन या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांना रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या होत्या. कोव्हिडचे रुग्ण वाढत असताना त्या सर्व रुग्णवाहिकांचा चांगलाच उपयोग झाला होता. मात्र, त्या सर्व रुग्णवाहिकांच्या चालकांना गेल्या एप्रिलपासून मानधनच मिळालेले नाही. शासनाकडून कुठलीच दखल घेतली जात नसल्याने अखेर त्या सर्वच्या सर्व म्हणजे नऊ रुग्णवाहिका चालकांनी आपले काम थांबविले होते. त्यामुळे त्या सर्व रुग्णवाहिका जागेवरच उभ्या होत्या. कोरोनाचा वेग मंदावला असला तरी तो पूर्ण संपलेला नाही. त्यामुळे संभाव्य धोके लक्षात घेता रुग्णवाहिका चालकांअभावी जागेवर उभ्या राहणे परवडणारे नाही. सध्या संप मिटला असला तरी शासनाने यामध्ये लक्ष द्यावे आणि त्या रुग्णवाहिका चालकांचे थकीत मानधन त्यांना तत्काळ मिळावे, यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी आता होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:52 PM 13-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here