संत ज्ञानेश्वरांच्या ७२५ व्या संजीवन समाधी निमित्ताने सांगीतिक कार्यक्रम

0

संगमेश्वर : संत ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधीनिमित्ताने कलांगण संगमेश्वर या संस्थेने रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) इंद्रायणी काठी हा सांगीतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. भारतीय अध्यात्मशास्त्राचे प्रणेते आणि सर्व तत्त्वज्ञ संतांच्या प्रातिनिधिक स्वरूपाचे प्रतीक म्हणून ओळखले जाणारे ब्रह्मसाम्राज्यचक्रवर्ती संत ज्ञानेश्वर हे मती गुंग करुन टाकणारी अलौकिक काव्यप्रतिभा लाभलेले रससिद्ध महाकवी होत. समाजाने दिलेल्या यातना स्वीकारून सकल विश्वाचे कल्याण चिंतणारा भूतदयावादी परमेश्वरभक्त अशा ज्ञानदेवांनी ज्ञानदेवीच्या रुपाने मराठीचा गौरव वाढवला आणि विश्वकल्याणाचे पसायदान मागून “माऊली” हे पद सिद्ध केले. श्रीविठ्ठलाचा प्राणसखा – पूर्णज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक असलेल्या ज्ञानेशांनी वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी आळंदी येथे इंद्रायणीच्या पावन तीरावर शके १२१८ मध्ये कार्तिक वद्य त्रयोदशीला दुर्मुखनामसंवत्सरी इसवी सन १२९६ रोजी, गुरुवारी संजीवन समाधी घेतली. यावर्षी या समाधी सोहळ्याला ७२५ वर्षे पूर्ण होत आहेत. या सप्तशतकोत्तर रौप्यमहोत्सवी संजीवन समाधी सोहळ्यानिमित्ताने कलांगण संगमेश्वर या संस्थेने सांगीतिक आदरांजली अर्पण करायचे ठरविले आहे. राजाभाऊ शेंबेकर यावेळी इंद्रायणी काठी हा कार्यक्रम सादर करणार आहेत. त्यांना हेरंब जोगळेकर (तबला), मिलिंद लिंगायत (पखवाज), चैतन्य पटवर्धन (संवादिनी), किरण लिंगायत (झांज) संगीतसाथ करणार आहेत. श्रीनिवास पेंडसे निरूपण करतील. रविवारी (दि. १४ नोव्हेंबर) सायंकाळी ५ वाजता धामणी (ता. संगमेश्वर) येथील दि ड्राइव्ह इन सभागृहात हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्याला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:14 PM 13-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here