प्रथापरंपरा जपत विठोबाची वार्षिक नगरप्रदक्षिणा संपन्न

0

रत्नागिरी : येथील विठ्ठल मंदिरातील श्री विठोबाची वार्षिक नगरप्रदक्षिणा आज दुपारी १ वाजता मंदिरातून सुरू झाली. या वेळी विठुरायाचा जयजयकार आणि आरती करून पालखी निघाली. कार्तिकी एकादशी झाल्यानंतर वैकुंठ चतुर्दशीला म्हणजे आज ही नगर प्रदक्षिणा काढण्यात आली. प्रथा, परंपरा जपत ही नगर प्रदक्षिणा पार पडली. यावेळी भाविकांचा उत्साह पाहण्यासारखा होता. विठुनामाचा गजर, चौकामध्ये आरती, ढोल-ताशांचा गजर, समुद्रस्नान अशी या प्रदक्षिणेची वैशिष्ट्ये आहेत. नगरप्रदक्षिणा गोखले नाका, धनजी नाका, गवळीवाडा, पोलिस मुख्यालय, जेल नाका, गोगटे कॉलेज, जिल्हा न्यायालय, श्री काशिविश्वेश्वर मंदिर, राजिवडा, खडपेवठार, तेली आळी तळे, चवंडेवठार, पाटील वाडी, श्री दत्त मंदिर, घुडेवठार, मांडवी नाका, मायनाकवाडी, भैरव मंदिर येथे पोहोचली. तिथून ८० फुटी हायवेवरून काळा समुद्र, समुद्रस्नान करण्यात आले. त्यानंतर कुरणवाडी, भाटकरवाडी, श्री सांब मंदिर, जोतिबा मंदिर, श्रीराम मंदिर, पेठकिल्ला, चिंचनाका, मुरुगवाडा, ग्रामदैवत श्री भैरी मंदिर, पांढरा समुद्र, विलणकर सहाण, मिऱ्या रोड पांढरासमुद्र, परटवणे, श्री भार्गवराम मंदिर, सावंतवठार, फगरवठार, वरचा फगर वठार, खेरबाग, डाफळेवाडी, डीएसपी बंगला, आंबेडकरनगर, दर्गा, धनजी नाका येथून ती परत श्री विठ्ठल मंदिरात आली. दरम्यान, मंदिरात विठोबाला विविध देवतांची रूपे लावण्यात येत आहेत. देखाव्यांचा उद्या शेवटचा दिवस असून त्रिपुरारी पौर्णिमेला आकर्षक देखावा करण्यात येणार आहे. कलाकार मनीष शिंदे ही सजावट करत असून मंडळाचे कार्यकर्ते त्यांना मदत करतात. विठ्ठल मंदिरात प्रतिवर्षाप्रमाणे उद्या (दि. १८ नोव्हेंबर) सायंकाळी त्रिपूर पाजळला जाणार आहे. यावेळी त्रिपूरपूजन करण्यात येणार आहे. कार्तिकोत्सवात समाप्तीची काकड आरती शनिवारी (दि. २० नोव्हेंबर) सकाळी होईल. त्यानंतर महापूजा ९.३० वाजता, भोवत्या होऊन कार्तिकोत्सवाची सांगता येईल. दुसऱ्या दिवशीपासून नित्य काकड आरती सुरू राहणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:51 PM 17-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here