राम मंदिर उभारणीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना अयोध्येतील नऊ मुस्लिमांनी राम जन्मभूमी परिसरात नवीन वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. या मुस्लिमांनी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टला पत्र लिहिले आहे. यामध्ये म्हटले आहे की, एकूण 67 एकरमधील 5 एकर जमीन कब्रस्तानची आहे. दरम्यान, या मुस्लीम लोकांच्या दाव्यावर बाबरीचे पक्षकार राहिलेले इक्बाल अन्सारी यांनी सांप्रदायिक सलोख्याचा सल्ला दिला आहे. देशातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा सन्मान केला आहे. आता अशाप्रकारे पत्र लिहून सांप्रदायिकरित्या एक नवीन वाद निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे इक्बाल अन्सारी यांनी म्हटले आहे. तसेच, याप्रकरणी रामलल्लाचे मुख्य पुजारी आचार्य सतेंद्र दास यांनी सांगितले की, “67 एकर जमिनीवर कोणती कब्र नाही आहे. त्याठिकाणी ऋषींची समाधी होती. कब्रच्या नावाखाली अडथळा आणला जात आहे. ज्याठिकाणी शंख वाजतो आणि पूजा केली जात आहे, त्याठिकाणाचे स्मशान किंवा कब्रस्तान सर्व शुद्ध होते.” विश्व हिंदू परिषदचे प्रवक्ता शरद शर्मा यांनी सांगितले की, “जे राम मंदिर उभारणीत विविध प्रकारे अडथळा निर्माण करत होते. ते सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर निराश झाले आहेत. हे लोक आता जे सांगत आहेत, त्यासंबंधी काहीच निशाणी 67 एकर जमिनीवर नाही आहे. गेल्या कित्येक वर्षांत मंदिरासाठी झालेल्या संघर्षात हजारो संतानीही आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. अशावेळी जर ज्याठिकाणी तथ्यहीन कब्रस्तान म्हटले जात आहे, तर त्याला संत शहिदा म्हणू शकतो.” दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारने 5 फेब्रुवारीपूर्वी ट्रस्ट स्थापन करावा तसेच मुस्लिमांना मशिदीसाठी अयोध्येत 5 एकर जागा द्यावी, असे सुप्रीम कोर्टाने सांगितले होते. त्यानुसार केंद्र सरकारने गेल्या काही दिवसांपूर्वी ‘श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टची स्थापना केली.
