रत्नागिरी-सिंधुदुर्गातून गेलेला गोवा मद्याचा ट्रक रायगडात पकडला; १ कोटी ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

0

रत्नागिरी : राज्य उत्पादन शुल्कच्या पाच जिल्ह्यातील अधिकारी आणि जवानांची नजर चुकवून गोव्यातून सिंधुदुर्ग-रत्नागिरीतील राष्ट्रीय महामार्गावरून गेलेला गोवा बनावटीच्या मद्याचा ट्रक पनवेल-सायन मार्गावरील रोडपाली उड्डाण पुलाजवळ राज्य भरारी पथकाने पकडला. तब्बल १२९० रॉयल ब्ल्यू व्हिस्कीचे बॉक्ससह ट्रक जप्त करण्यात आला आहे. हे मद्याचे बॉक्स काजू बियांच्या टरफलांमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. दोघांना अटक करून त्यांच्याकडील सुमारे १ कोटी ८ लाख रुपयांचा हा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राज्य भरारी पथकाच्या विशेष पथकातील अधिकाऱ्यांवर गोव्यातील मद्य तस्करांनी सुमारे अडीच महिन्यांपूर्वी जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर गोव्यातील इग्लिश मद्य महाराष्ट्रात येऊच नये यासाठी गोवा-सिंधुदुर्ग सीमेवर राज्य उत्पादन शुल्कच्या पाच जिल्ह्यांतील अधिकारी, जवानांची दिवस-रात्र गस्त ठेवण्यात येत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी आणि जवानांना सलग तीन ते पाच दिवस सीमेवर ड्यूटी लावली जात आहे. सीमेवरील बंदोबस्तामुळे गोवा बनावटीचे मद्य गोव्यातून बाहेर पडणे बंद झाल्याचे वाटत असतानाच भरारी पथकाने पनवेल-सायन मार्गावरील रोडपाली फाटा येथील उड्डाण पुलाखाली गोव्यातून बाहेर पडून रत्नागिरी-सिंधुदुर्ग मार्गे गेलेला ट्रक शनिवारी मध्यरात्री पकडला. या प्रकरणी ट्रक चालक योगेश विष्णूप्रसाद मीना (३८, रा.मध्य प्रदेश), क्लीनर राहुल बाबूलाल भिलाला (२०, रा.मध्य प्रदेश) या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. राज्यभरारी पथकातील निरीक्षक संताजी लाड, दुय्यम निरीक्षक प्रमोद कांबळे, जवान अमोल चिलगर, धनाजी दळवी, श्रीराम राठोड, प्रविण धवणे, सोमनाथ पाटील, संतोष धावरे यांनी ही कारवाई केली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:40 AM 22-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here