बँकॉक : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू सायना नेहवालने थायलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या दुसर्या फेरीत धडक मारली. तर, पुरुष एकेरीत किदाम्बी श्रीकांत, एच. एस. प्रणॉय, पारुपल्ली कश्यप व शुभंकर डे यांनीदेखील पुढच्या फेरीतील आपली जागा निश्चित केली. सायनाने महिला एकेरीत थायलंडच्या फिटायापोर्न चाईवानला सरळ गेममध्ये नमविले. दोन महिन्यानंतर कोर्टवर उतरलेल्या सायनाने चाईवानला 21-17, 21-19 असे पराभूत केले. दुखापतीमुळे सायना इंडोनेशिया ओपन व गेल्या आठवड्यात झालेल्या जपान ओपन स्पर्धेमध्ये सहभागी झाली नव्हती.सातव्या मानांकित सायनाचा सामना आता पुढच्या फेरीत सयाका ताकाहाशी हिच्याशी होणार आहे. पुरुष एकेरीत भारतीय खेळाडूंनी चमक दाखवली. पाचव्या मानांकित किदाम्बी श्रीकांतने चीनचा क्वालिफायर खेळाडू रेन पेंग बो ला एक तास आठ मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-13, 17-21, 21-19 असे पराभूत करीत आगेकूच केली. दुसर्या फेरीत श्रीकांतचा सामना थायलंडच्या खोसित फेतप्रदाबशी होईल. एच. एस. प्रणॉयने हाँगकाँगच्या वोंग विंग कि विन्सेंटला 21-16, 22-20 असे पराभूत केले. तर, कश्यपने इस्राईलच्या मिशा जिल्बरमेनच्या 18-21, 21-8, 21-14 असे नमविले. प्रणॉयचा सामना जपानच्या सहाव्या मानांकित केंतो निशिमोटो व कश्यपचा सामना तैपेईच्या तिसर्या मानांकित चोऊ टीएन चेनशी होईल. शुभंकर डे हा नशीबवान ठरला. पहिल्याच फेरीत त्याची गाठ अव्वल मानांकित व जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी असलेल्या जपानच्या केंतो मोमोटाशी होता. मात्र, त्याला ‘वॉक ओव्हर’ मिळाला. सौरभ वर्माला मात्र पराभूत व्हावे लागले. त्याला सातव्या मानांकित जपानच्या कांता सुनेयामाविरुद्ध 64 मिनिटे चाललेल्या सामन्यात 21-23, 21-19, 5-21 असे पराभूत व्हावे लागले. प्रणव जेरी चोपडा व एन. सिक्की रेड्डी जोडीने भारताच्या मिश्र दुहेरी जोडीने जपानच्या कोहेई गोंडो व अयाने कुरिहारा जोडीला 21-16, 21-13 असे पराभूत केले. आता पुढच्या फेरीत त्यांचा सामना टांग चुन मान व से यिंग सुएट या आठव्या मानांकित मलेशियन जोडीशी होणार आहे. महिला एकेरीत साई उत्तेजिता राव चुक्काला चीनच्या चेन जियाओ जिनने पहिल्या फेरीत 17-21, 7-21 असे नमविले.
