परशुराम घाट दिवसेंदिवस धोकादायक

0

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाट दिवसेंदिवस धोकादायक होत चालला आहे. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी दरम्यान खचलेल्या रस्त्याची अद्याप डागडुजीही करण्यात आली नसल्याने या ठिकाणी पुन्हा रस्ता खचू लागला असून हा घाट पार करताना प्रवासी आणि चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी ज्या जागा संपादित करण्यात आल्या त्यापैकी काही जागांच्या मालकी हक्काचा तिढा अद्याप सुटलेला नाही. परशुराम घाटातील जमीन ही देखील मालकी हक्काचा तिढा न सुटलेल्या जागांपैकी एक आहे. त्यामुळे या घाटातील चौपदरीकरणाचे काम ठेकेदार कंपनीने अद्याप सुरू केलेले नाही. नागमोडी वळणे, तीव्र उतार आणि रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे यामुळे आधीच धोकादायक असलेल्या घाटातील रस्त्याचा काही भाग जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीच्या खचला होता. घाट वाहतुकीला बंद झाल्याने पर्यायी व्यवस्था म्हणून या ठिकाणच्या गटारात भराव टाकून खोळंबलेली वाहतूक सुरु करण्यात आली होती. पावसाळा संपताच ज्या ठिकाणी रस्ता खचला होता त्या ठिकाणची डागडुजी करणे गरजेचे होते. महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी ठेकेदाराला आवश्यक त्या सूचना देऊन हे काम युद्धपातळीवर करून घ्यायला हवे होते. मात्र पावसाळा संपून काही महिने उलटले तरी ठेकेदाराने खचलेल्या रस्त्याची डागडुजी करण्याबाबत काहीच हालचाल केलेली नाही. किमान ज्या ठिकाणी रस्ता खचला आहे त्या ठिकाणच्या परिस्थितीची चालकांना कल्पना यावी यासाठी ठेकेदाराने एखादा सूचना फलक किंवा सुरक्षा रक्षक च्यामायला हवा होता मात्र तसेही काही करण्यात आलेले नसल्याने ठेकेदार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी या ठिकाणी एखादा भीषण अपघात होण्याची वाट तर पाहत नाहीत ना अशी शंका उपस्थित होत आहे.
खेड तालुक्याच्या हद्दीतील महामार्ग चौपदरीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. कशेडी ते परशुराम घाट या दरम्यानच्या 44 किलोमीटर महामार्गापैकी सुमारे 38 किलोमीटर कामाचे काँक्रीटीकरण झालेले आहे. मात्र परशुराम घाटात महामार्गाची संपादित केलेल्या जागेच्या मोबदल्याबाबत परशुराम देवस्थान, खोत व कुळ यांच्यात निर्माण झालेल्या वादाचा तिढा अद्याप सुटलेला नसल्याने या ठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाला अद्याप सुरवातही झालेली नाही.
संबंधित ठेकेदाराला काम सुरु करण्याबाबत प्रशासनाकडून वारंवार सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र तरीही ठेकेदार कंपनी काम सुरु करण्यास तयार नसल्याने परशुराम घागटाचे चौपदरीकरण होणार की नाही, झाले तर ते कधी होणार याबाबत ठोसपणे काहीच सांगता येत नाही. परशुराम घाटाचे रखडलेले काम सुरु करण्यासाठी जमीन मालक, खोत व कुळांनी एकत्र बसून आपापसात तोडगा काढावा अशी सूचना प्रशासनाकडून करण्यात आली होती. जमिनीच्या मोबदल्याबाबत कूळ 80 टक्के, खोत 10 टक्के व देवस्थान 10 टक्के अशा पद्धतीने प्रशासनाकडून प्रस्तावही ठेवण्यात आला होता. जिल्हाधिकारी यांनीही याबाबत कूळ व देवस्थानसाठी 90-10 चा प्रस्ताव दिला होता. मात्र, या दोन्ही प्रस्तावांवर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे पेढे व परशुरामच्या ग्रामस्थांनी पुन्हा चौपदरीकरणास तीव्र विरोध केला असल्याने घाटाचे चौपदरीकरण रखडले आहे.
या घाटात वाहनांची सतत वर्दळ सुरू असते. त्यामुळे या घाटाच्या चौपदरीकरणाबाबत असलेले वाद मिटवून चौपदरीकरणाचे काम काम वेळेत सुरू केले नाही तर या घाटात भीषण दुर्घटना घडण्याची भीती शक्यता नाकारता येत नाही. सध्या कोसळत असलेल्या अवकाळी पावसामुळे आधीच धोकादायक ठरलेल्या परशुराम घाटातील धोका क्षणाक्षणाला वाढत चालला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:34 PM 23-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here