कोलांलपूरहून ८ मार्च २०१४ रोजी बीजिंगला जाणाऱ्या मलेशियन एअरलाईन्सच्या विमानाच्या पायलटने आत्मघात करून हे विमान समुद्रात बुडविले, असा त्या देशाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कयास आहे, असा दावा आॅस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी केला आहे. या विमानात असलेल्या २३९ प्रवाशांमध्ये चीनच्या नागरिकांची बहुसंख्य होती. हे विमान हिंद महासागरात जिथे कोसळले असा संशय आहे, तेथील १,२०००० किमी परिसरात आॅस्ट्रेलियाच्या पथकाने समुद्राखाली विमानाच्या अवशेषांचा शोध घेतला; पण हाती काहीच न लागल्याने अखेर जानेवारी २०१७ मध्ये ही शोधमोहीम थांबविण्यात आली. त्यानंतर २०१८ साली अमेरिकेच्या एका खाजगी कंपनीने या विमानाच्या शोधासाठी समुद्रतळात मोहीम हाती घेतली; पण त्यांनाही काहीच सापडले नाही. त्यामुळे हे विमान बेपत्ता कसे झाले असावे याच्या अनेक कहाण्या, दंतकहाण्या गेल्या काही वर्षांत पसरल्या आहेत. पायलट झाहरी अहमद शाह यानेच आत्मघात करून हे विमान समुद्रात बुडविले असावे, असा मलेशियाच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कयास असल्याचे आॅस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान टोनी अॅबॉट यांनी सांगितल्याने खळबळ माजली आहे. मात्र अॅबॉट यांनी केलेला दावा झाहरीच्या कुटुंबियांनी फेटाळून लावला आहे. अॅबॉट यांनी केलेल्या दाव्याला पुष्टी देणारा पुरावाच उपलब्ध नाही, असे मलेशियाच्या हवाई वाहतूक नियंत्रण विभागाचे माजी प्रमुख अझरुद्दीन अब्दुल रहमान यांनी म्हटले आहे.
