नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि लेफ्टनंट कर्नल (मानद) महेंद्रसिंग धोनीने लष्करातील आपले कर्तव्य बजावण्यास बुधवारपासून सुरुवात केली. धोनी हा काश्मीरमध्ये 15 दिवस दहशवादविरोधी पथकात तैनात असेल. टीम इंडियाचा ‘कूल यष्टिरक्षक’ धोनी सध्या 106 टेरिटोरियल आर्मी बटालियनच्या पॅरा कमांडो युनिटमध्ये तैनात आहे. 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्रदिन साजरा केल्यानंतर धोनी पुढील ट्रेनिंगसाठी बंगळूरला जाणार आहे. दरम्यान, तो काश्मीरमध्ये सुमारे 19 किलो वजनाचे साहित्य घेऊन आपले कर्तव्य पार पाडणार आहे. धोनी तैनात असलेल्या पॅरा कमांडो युनिट हे सर्व प्रकारच्या जवानांचे युनिट आहे. म्हणजेच देशाच्या प्रत्येक भागातून आलेल्या जवानांचा या युनिटमध्ये समावेश आहेे. धोनी येथे दिवसा आणि रात्री अशा दोन्ही शिफ्टमध्ये आपले कर्तव्य बजावणार आहे. यादरम्यान धोनीजवळ 3 मॅगझील (5 किलो), गणवेश (3 किलो), बूट (2 किलो), 3 ते 6 ग्रेनेड (4 किलो), हेल्मेट (1 किलो), बुलेटफ्रूफ जॅकेट (4 किलो) असे एकूण 19 किलो साहित्य असणार आहे. या सर्व साहित्यासह धोनी आपले कर्तव्य पार पाडणार आहे.
