कोरम असतानाही ग्रामसभा केली तहकूब, संगमेश्वरमधील निवे बुद्रुक येथील ग्रामस्थांची जिल्हा परिषदेकडे तक्रार

0

रत्नागिरी : राज्यात तसेच जिल्ह्यात अनेक ठिकाणी कोरमअभावी ग्रामसभा तहकूब होत आहेत. दुसरीकडे मात्र कोरम असतानाही सभा तहकूब केली असल्याचा प्रकार पुढे आला आहे. संगमेश्वर तालुक्यातील निवे बुद्रुक गावातील ग्रामस्थांनी याबाबत जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या सर्व प्रकरणाची चौकशी करून सरपंच व सहकार्य करणाऱ्या सदस्यांवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिला टप्पा असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेला सध्या विशेष महत्त्व आलं आहे. ग्रामसभेच्या ठरावावर विकासात्मक अनेक गोष्टी ठरत आहेत. मात्र अनेक ठिकाणी कोरमअभावी ग्रामसभा तहकूब होण्याचे प्रकार वाढले आहेत. असे असले तरी काही ठिकाणी ग्रामसभांना ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो. कोरम असतानाही ग्रामसभा तहकूब केल्याचा प्रकार जिल्हा प्रशासनाला ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीवरून पुढे आला आहे. निवे बुद्रुक ग्रामपंचायतीची मंगळवारी ग्रामसभा होती. त्यानुसार ग्रामस्थांनी सभेसाठी उपस्थिती लावली होती. तब्बल ९१ग्रामस्थांच्या रजिस्टरवर सह्या झाल्यानंतर हे रजिस्टरच ग्रामस्थांकडून काढून घेण्यात आले व सभा तहकूब झाल्याचे जाहीर केले, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसे निवेदनही जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहे. ग्रामसभेला कोरम पूर्ण होण्यासाठी आवश्यक ग्रामस्थ ग्रामपंचायतीमध्ये हजर होते व ग्रामसभेच्या जागेअभावी लोकांनासह्या करण्यासाठी वेळ लागत होता. जागा नसल्याने काही ग्रामस्थ सभागृहाच्या बाहेर थांबले होते. मात्र काही ग्रामस्थांच्या सह्या शिल्लक असतानाच सरपंच यांनी सह्यांचे रजिस्टर उर्वरित उपस्थित ग्रामस्थांच्या सह्या होण्यापूर्वीच ताब्यात घेतले व कोरमअभावी ग्रामसभा तहकूब झाली असल्याचे जाहीर केले, असे या निवेदनात म्हटले आहे. खरंतर ग्रामपंचायतीमध्ये सर्वोच्च असणाऱ्या ग्रासमभेचा अपमान झाला आहे. कामात हलगर्जीपणा व बेजबाबदार कृत्य केले. याप्रकरणी सरपंच व त्यांना सहकार्य करणाऱ्या सर्व सदस्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, असे निवेदनात म्हटले आहे. तसेच ग्रामसभांचे खच्चीकरण करणाऱ्या अशा लोकांवर कारवाई करावी. तसेच सभेला बहुसंख्य ग्रामस्थ मोलमजुरी करणारे आहेत. हे ग्रामस्थ आपला रोजगार बुडवून ग्रामसभेला उपस्थित होते. परंतु ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभारामुळे लोकांना त्रास तसेच आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे, याचा गांभीर्याने विचार करावा, असे या निवेदनात स्पष्ट म्हटले आहे. या निवेदनावर १०८ ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:58 PM 25-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here