राज्यातील पोलीसपाटील यांचे थकीत मानधन देण्यासाठी निधीची तरतूद करण्याबाबत येत्या दोन दिवसांत नियोजन व अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत मुंबईत बैठक आयोजित केली आहे. त्यातून पोलीसपाटील यांच्या मानधनाचा प्रश्न निकाली लागेल, असा विश्वास गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. राज्यातील २७ हजार पोलीसपाटलांना गेल्या पाच महिन्यांत मानधन मिळाले नाही. शासनाकडून मंजूर झालेल्या अनुदानापैकी सुमारे १०२ कोटींचा निधी आॅगस्टपर्यंत पोलीसपाटलांना वितरित झालेला आहे; पण फक्त १० टक्केच निधी शिल्लक राहिल्याने तो वाटायचा कसा? असा प्रश्न शासनासमोर आहे. ही परिस्थिती सत्य असल्याचे सांगून गृहराज्यमंत्री सतेज पाटील म्हणाले, पोलीसपाटील यांच्या मानधनामध्ये गेल्यावर्षी दुप्पट वाढ करण्यात आली. पण त्या प्रमाणात गतवेळच्या सरकारने निधीची वाढीव तरतूद केली नसल्याने मानधन वाटताना मंजूर निधी सहा महिन्यांतच संपला. पोलीसपाटील महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार येत्या दोन दिवसांत नियोजन व अर्थराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत मंत्रालयात निधीबाबत बैठक आयोजित केली आहे.
