गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : गृहमंत्री दिलीप वळसे पाटील

0

मुंबई : महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू करण्यात आली असून त्याची कठोर अंमलबजावणी सुरु आहे. परंतु इतर राज्यातुन येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमेवरील तपासणी कडक करण्यात यावी. तसेच अवैध गुटखा वाहतूक व विक्री करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू आणि सुपारी, खर्रा, मावा यासारख्या प्रतिबंधित अन्नपदार्थांचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात गृहमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, प्रधान सचिव संजय सक्सेना, अन्न व औषध प्रशासन आयुक्त परिमल सिंग, अतिरिक्त पोलीस महासंचालक राजेंद्र सिंग, सहसचिव दौलत देसाई, यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. राज्यामध्ये सन २०१२ पासून गुटखा, पानमसाला, सुगंधित तंबाखू,सुपारी व इतर पदार्थाच्या विक्री व वापरास प्रतिबंध करण्यात आलेला आहे. या प्रतिबंधित अन्य पदार्थाच्या बंदीची अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत पोलिस विभागाच्या सहाय्याने करण्यात येते आहे. परंतु परराज्यातून मोठ्या प्रमाणावर गुटखा अवैध पद्धतीने राज्यात आणला जातो तसेच वितरण आणि विक्री केली जाते. यासाठी अन्न व औषध प्रशासन व पोलिस विभाग यांनी संयुक्तपणे मोहिम राबवावी. तसेच पोलीस यंत्रणांनी या सर्व अन्नपदार्थांची उत्पादन, विक्री, साठवणूक, वितरण व वाहतूक करणाऱ्याविरुद्ध अधिक दक्ष राहून प्रभावी पणे कारवाई करावी. याबरोबरच प्राप्त तक्रारीची तातडीने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश वळसे पाटील यांनी यावेळी दिले. अन्न व औषधं प्रशासन मंत्री डॉ शिंगणे यांनी इतर राज्यातून आपल्या राज्यात येणारा गुटखा रोखण्यासाठी सीमाक्षेत्रात खबऱ्यांचे नेटवर्क मजबूत करावे, तसेच पोलीस यंत्रणांनी यापूर्वी दाखल तक्रारीवर कठोर कारवाई करावी यामुळे संबंधितावर वचक निर्माण होईल, असे सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:46 PM 26-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here