‘कामगारांच्या पुढाऱ्यांना एसटी कायमची बंद करण्याची सुपारी दिलेली दिसते, ..अशाप्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार?’

0

मुंबई : परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांना 41 टक्के पगारवाढ केली आहे. मात्र, अद्यापही कामगारांच्या मोठ्या गटाचा संप सुरूच आहे. परब यांनी वारंवार कडक कारवाईचा इशारा दिल्यानंतरही कामगार कर्तव्यावर रुजू झाला नाही. राज्यातील अनेक डेपोंमध्ये बसची घंटा वाजलीच नाही. त्यामुळे, कोट्यवधी जनतेचे हाल सुरू आहेत. कामगारांच्या या भूमिकेवरुन शासनाने नाराजी व्यक्त केली आहे. तर, शिवसेनेनंही, अशा प्रसंगी परमेश्वर व सरकार तरी काय करणार? असे म्हणत संप नेतृत्वावर टीका केलीय. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर आणि संप नेतृत्त्वाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. एस.टी. ही सेवा आहे, उद्योग आहे. त्या सेवेत 93 हजार कामगार काम करतात व त्यांना एस.टी. महामंडळ पगार देत असते. एस.टी. महामंडळच मोडीत काढण्याचे व ते शासनात विलीन करायचे, अशी संपकऱ्यांची भूमिका आहे. त्यामुळे कामगारांना सुरक्षा व स्थैर्य मिळेल, पण सरकारने घसघशीत पगारवाढ करून, कर्मचाऱ्यांच्या पगाराची हमी घेऊन सकारात्मक पाऊल टाकले. तरीही एस.टी. कामगारांचे पुढारी संपाचा हेका सोडायला तयार नाहीत. याचा एकच अर्थ काढता येईल. कामगारांच्या पुढाऱ्यांना कोणीतरी एस.टी. कायमची बंद करण्याची सुपारी दिलेली दिसते. शासकीय एस.टी. बंद करून प्रवासी वाहतूक खासगी लोकांच्या घशात टाकण्याचे हे उद्योग आहेत, अशा शब्दात कामगार नेतृत्वाच्या भूमिकेवर शिवसेनेनं जोरदार हल्ला चढवला आहे.

भारतीय जनता पक्षाने एअर इंडियाचे खासगीकरण केले, रेल्वेबाबत विचार सुरू आहेत. आता एस.टी. बंद पाडण्यासाठी संपकऱयांच्या आगीत तेल ओतण्याचे प्रयत्न झाले, ते राज्याच्या हिताचे नव्हतेच. पडळकर व खोत हे भारतीय जनता पक्षाचेच पुढारी आहेत. आता त्यांनी माघार घेतली असली, तरी पहिल्या दिवसापासून त्यांची भूमिका आक्रस्ताळेपणाचीच होती. भारतीय जनता पक्षाचे प्रमुख लोक तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडपणे समोर येऊन संपकऱ्यांना कामावर जाण्याचे आवाहन केले पाहिजे, असेही संजय राऊत यांनी सामनातून म्हटले आहे.

एस.टी. कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिलो. विलीनीकरणाच्या मागणीला आपला पाठिंबा आहेच, परंतु त्यातील तांत्रिक अडचणी सोडविण्यासाठी वेळ लागेल. सरकारने पहिल्यांदाच इतकी मोठी वेतनवाढ केली आहे, याचा कर्मचाऱ्यांनी विचार करावा, असे आवाहन पडळकर यांनी केले. पडळकर, खोत यांनी आग लावली, पण आता ती त्यांना विझविता येत नाही. हे आंदोलकांच्या नेतृत्वाचे अपयश आहे. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अनिल परब यांच्या नावाने शिमगा करून प्रश्न सुटणार नाहीत. राजकीय खाज शमेल इतकेच!

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:12 PM 27-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here