संप काळात देवरूख आगारातील कर्मचार्‍यांचे रक्तदान

0

देवरूख : संप काळातही रक्तदान करून अनोखा आदर्श निर्माण केला आहे तो देवरूख आगारातील एसटी कर्मचार्‍यांनी. मुंबईतील आझाद मैदानावर 16 दिवस उपोषण करून शारीरिक व मानसिकरित्या खचलेल्या कर्मचार्‍यांनी संपकाळात रक्तदानासाठी पुढाकार घेऊन सामाजिक बांधिलकीचे व्रत कायम जपले आहे. देवरूख आगारातील कर्मचार्‍यांच्या अनेक संघटना आहेत. मात्र सामाजिक कार्यासाठी हे कर्मचारी एकजुटीने सरसावत असतात. प्रवाशांच्या सेवेसोबतच इतरही सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमात हे कर्मचारी कार्यरत असतात. सर्व भेदभाव विसरून सामाजिक कार्याची चळवळ या कर्मचार्‍यांनी सुरू ठेवली आहे. एसटी कर्मचार्‍यांचे शासनात विलिनीकरण करावे, यासाठी येथील कर्मचार्‍यांनी संप सुरू केला आहे. सध्या पगारवाढीचे आश्‍वासन शासनाने दिले असले तरी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर हे कर्मचारी ठाम आहेत. मुंबई येथील आझाद मैदान, रत्नागिरी विभागीय नियंत्रक कार्यालय याठिकाणी या कर्मचार्‍यांनी आंदोलन छेडले. सध्या मुंबई येथील आंदोलन स्थगित करून कर्मचारी संपावर मात्र ठाम राहिले आहेत. गेले अनेक दिवस संप असल्याने आर्थिक संकटाला हे कर्मचारी सामोरे जात आहेत. त्यातच शासनाने कारवाई केल्याने मानसिकदृष्ट्या हे कर्मचारी खचले आहेत. याही मानसिकतेत संप काळात काही तरी चांगले सामाजिक कार्य आपल्या हातून घडावे, हा विचार येथील कर्मचार्‍यांच्या मनात आला. त्यानंतर त्यांनी यावर चर्चा केली व रक्तदान करण्याची तयारी दर्शवली. डेरवणच्या वालावलकर हॉस्पीटल प्रशासनाने रक्तसंकलनासाठी सहाय्य केले. सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, इंदिरा इस्टिट्युटचे फार्मसी कॉलेज यांनीही या शिबिरासाठी योगदान दिले. कर्मचार्‍यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. देवरूख आगारातील कर्मचार्‍यांनी आवाहनाला प्रतिसाद दिला. संपकाळातही त्यांच्याकडून चांगले कार्य घडले, याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया युयुत्सु आर्ते यांनी यावेळी व्यक्त केली. या उपक्रमासाठी राजू घोसाळकर, आनंदा दांडेकर, संतोष भोसले, समीर खेतल, मिथुन शिंदे यांच्यासह कर्मचार्‍यांनी पुढाकार घेतला.

देवरूख डेपोतील एसटी कर्मचारी विविध उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी जपत असतात. रक्तदानासारखे श्रेष्ठदान आमच्याकडून घडले, ही समाधान देणारी बाब आहे, असे समीर शिंदे, एसटी कर्मचारी, देवरूख यांनी म्हटले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:53 PM 27-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here