प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी: जिल्ह्यात एसटीचे 9 पैकी 7 आगार पुन्हा सुरु

0

रत्नागिरी : एसटी कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलन सुरूच आहे. परंतु आता हळूहळू कर्मचारी कामावर हजर होऊ लागल्याने जिल्ह्यात मंडणगड, रत्नागिरी आगार वगळता अन्य सातही आगारातून वाहतूक थोड्या प्रमाणात सुरू झाली. यामुळे जिल्ह्यात आज 73 फेऱ्या सोडण्यात आल्या. गावात लालपरी पोहोचल्याने प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला. पुढील दोन दिवसांत आंदोलन मिटून वाहतूक सुरळीत होईल, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. एसटी विभागातील 380 कर्मचारी रविवारी कामावर रूजू झाले. यामध्ये चालक, वाहकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे उद्या-परवापासून एसटी हळूहळू पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. लांजा, गुहागर, दापोली, चिपळूण आदी आगारांतून आज गाड्या सोडण्यात आल्या. देवरूख आगारात काही कर्मचाऱ्यांमध्ये कामावर हजर होण्याबाबत मतप्रवाह पाहायला मिळाले. परंतु काल अनेक कर्मचारी देवरूखमध्ये हजर झाले होते आणि वाहतूकही सुरू झाली होती. पण देवरूख आगारातून एकही गाडी सुटली नाही. रत्नागिरी विभागात रविवारी 39 कर्मचाऱ्यांचे निलंबित करण्यात आले. तसेच 66 कर्मचाऱ्यांची सेवासमाप्ती करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत निलंबित कर्मचारी संख्या 148 आणि सेवासमाप्ती केलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या 183 झाली आहे. परिवहनमंत्री अनिल परब यांनी निलंबित कर्मचाऱ्यांना आवाहन केल्यानुसार काही कर्मचारी हजर झाले आहेत. त्यामुळे त्यांचे निलंबन रद्द होऊ शकते. परंतु त्याचा निर्णय काही दिवसांनी जाहीर करण्यात येईल. दरम्यान, कोल्हापूर, सातारा, सांगली, येथील बहुतांशी आगार चालू झाल्यामुळे रत्नागिरीत नोकरी करणारे एसटी कर्मचारी पुन्हा रत्नागिरीत कामावर हजर होण्याची शक्यता आहे. यामुळे सोमवारपासून अधिक कर्मचारी कामावर हजर होतील आणि एसटी फेऱ्या सोडण्यात येतील, असा अंदाज अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. रत्नागिरीतील आंदोलन सुरूचरत्नागिरी शहरातील माळनाका येथील एसटी विभागीय कार्यालयाबाहेर अजूनही कर्मचारी काम बंद आंदोलन करत आहे. विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ते ठाम असले तरी जिल्ह्यातील ज्येष्ठ कर्मचारी आता कामावर हजर होऊ लागले आहेत. त्यामुळे आंदोलन चालू ठेवण्याबाबतही मतप्रवाह कर्मचाऱ्यांनी बोलून दाखवले. दोन दिवसांत हे कर्मचारी हजर होतील आणि गाड्या सुटतील, याकडे प्रवाशांचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:10 AM 29-Nov-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here