रंगभूमी चळवळ वाढण्यासाठी परस्पर सहकार्याची गरज – दादा लोगडे

0

नवे शिकण्याची वृत्ती, दुसऱ्या व्यक्तीचे म्हणणे ऐकून घेण्याची सवय आणि विनम्रता हे गुण कलावंतांच्या प्रगतीला पोषक ठरतात, असे मत प्रसिद्ध आणि लोकप्रिय रंगभूषाकार आणि नेपथ्यकार दादा लोगडे यांनी व्यक्त केले. अविनाश काळे यांच्या प्रयत्नांनी नियमितपणे चाललेल्या गोळप (ता. रत्नागिरी) येथील मासिक ‘गोळप कट्टा’ या कार्यक्रमात ते या महिन्याचे मानकरी म्हणून बोलत होते. ‘गोळप कट्ट्या’चे हे तेरावे पुष्प होते. रंगभूमी ही चळवळ आहे, तीमध्ये परस्पर सहकाऱ्याची भावना वाढीस लागण्यासाठी अशा प्रकरच्या ‘कट्टयां’ची गरज आहे, असे लोगडे म्हणाले. वयाच्या आठव्या-नवव्या वर्षी शालेय विद्यार्थी जीवनातच दादांच्या रंगकर्मी प्रवासाचा प्रारंभ झाला. चित्रकला हा आवडीचा विषय. कसलेही मार्गदर्शन नसताना चित्रकलेची परीक्षा दिली. पुढे कलेचे उच्च शिक्षण घेण्यासाठी मुंबईतील एम. डी. सोमण या अधिकाऱ्यांचे विशेष सहाय्य मिळाले. ‘जे.जे. स्कूल ऑफ आर्ट’मध्ये दोन वर्षे शिक्षण घेतले. दादरच्या आगर बाजारात राहत असताना भाऊ रांगणकर, पार्सेकर यांनी नाटकासाठी पडदे रंगविण्याची संधी मिळवून दिली. ‘प्रतीकात्मक’ वगैरे संकल्पना स्पष्ट झाल्या नव्हत्या. अशा प्रकारचे अनुभव नव्या पिढीला मिळणे गरजेचे आहे, असे दादा म्हणाले. रंगमंचावर कुठली वस्तू कुठे ठेवायची त्याचे ज्ञान रघुवीर तळाशीलकर यांच्यासारख्या ज्येष्ठ कलावंताच्या सहवासाने मिळाले. नाट्यक्षेत्र ही एक चळवळ मानून काम करताना अनेक माणसे जोडता आली. गावचे सरपंचपद सांभाळताना रंगभूमीशी असणाऱ्या संबंधामुळे काही विकासकामांना सहजपणे निधी मिळाल्याचा अनुभव त्यांनी सांगितला. सर्व गुणवंत लोकांनी एकत्र आले पाहिजे अशी इच्छा त्यांनी बोलून दाखविली. मानसिक आणि शारीरिक आरोग्याला नाटक पोषक आहे, असे ते म्हणाले. नाटक मी नाही पण कोणीतरी केले त्याचे कौतुक करण्याची भावना वाढीस लागली पाहिजे, असेही मतही त्यांनी नोंदविले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here